मुंबई : अल्पावधीतच जनतेचा आवाज बनलेल्या ‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीचा पहिला वर्धापन दिन गुरुवारी (दि. 29) मुंबईतील ‘ताज प्रेसिडेंट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा होत आहे. यानिमित्त आयोजित ‘पुढारी न्यूज-महासमिट’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि मराठी नाट्य तसेच चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार सहभागी होत आहेत.
गुरुवारी सकाळी 10.30 वाजता विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘पुढारी न्यूज- महासमिट’चे उद्घाटन होईल. यावेळी ‘पुढारी’ समूहाचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आपली भूमिका मांडतील. दिवसभर चालणार्या या महासमिटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रकट मुलाखती घेण्यात येतील.
मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांवर दोन स्वतंत्र परिसंवाद या महासमिटमध्ये होत आहेत. ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता सुबोध भावे, निर्माता निखिल साने तसेच केदार शिंदे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे हे या परिसंवादांत सहभागी होत आहेत. याच महासमिटमध्ये बिझनेसमॅन समिटही आयोजित करण्यात आली असून, नाशिकचे ख्यातनाम दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, चितळे बंधू समूहाचे इंद्रनील चितळे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सुशील जाधव हे या समिटमध्ये आपले विचार मांडतील. या सर्व उद्योजकांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल.
महाराष्ट्राच्या शहरा-शहरांना जोडणारे गतिमान महामार्ग उभारून मराठी माणसातील भौगोलिक अंतर कमी करणार्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची मुलाखत हेदेखील या महासमिटचे मोठे आकर्षण असेल. यासोबतच महामुंबई प्रदेशात पायाभूत सुविधांचे महाकाय जाळे उभारणार्या ‘एमएमआरडीए’चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे ज्येष्ठ अधिकारीही पायाभूत सुविधांवर होणार्या संवादात सहभागी होत आहेत.
सायंकाळी माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या महासमिटचा समारोप होईल. या सोहळ्यात ‘पुढारी’ समूहाचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव हे समूहाच्या भविष्यकालीन वाटचालीचा वेध घेतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत हे या समारोप सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल.
‘पुढारी न्यूज-महासमिट’मध्ये उद्याच्या महाराष्ट्रासाठी मान्यवरांचे हे विचारमंथन ऐकण्यासाठी विविध क्षेत्रांतील निमंत्रित जाणकार व मान्यवर उपस्थित राहणार असून, या महासमिटमधील सर्व सत्रांचे थेट प्रक्षेपण ‘पुढारी न्यूज’ वाहिनीवर होणार आहे.