पुढारी ऑनलाईन डेस्क
कोकणातील जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Weather) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा (मुंबई) प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यात २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्येही आज, उद्या यलो अलर्ट राहील. कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्याला आज (दि. २८ ऑगस्ट) यलो अलर्ट देण्यात आला असल्याचे हवामान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर राहील, असेही नमूद करण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या ७ दिवसांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
सौराष्ट्र आणि कच्छवर वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. सौराष्ट्र आणि कच्छवरील हे डीप डिप्रेशन गेल्या ६ तासांमध्ये १२ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ते सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशातून हळूहळू पश्चिम-नैऋत्येकडे सरकून २९ ऑगस्टच्या सकाळपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी आणि पाकिस्तानच्या लगतच्या भागात आणि ईशान्य अरबी समुद्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे सौराष्ट्र आणि कच्छमधील तुरळक ठिकाणी २९ ऑगस्ट रोजी जोरदार ते अतिवृष्टी आणि ३० ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.