मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची आम्हाला घाई नाही. महायुतीची सत्ता स्थापन करणे हेच उद्दिष्ट आहे. जागांचा गृहपाठ पूर्ण झालेला आहे. लोकसभेवेळी उमेदवारीला विलंब झाला, तसे विधानसभेला होणार नाही. यावेळी पूर्ण तयारीने एकमत करून पुढे जाऊ. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
आज (दि. ९) महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. वातावरण तापायला सुरू होऊ द्या, महायुतीत गळतीपेक्षा जास्त भरती सुरू होईल, असे सांगत शंभूराज देसाई म्हणाले की, महायुतीतील तिन्ही पक्ष आणि घटकपक्षांमध्ये बुथस्तरावर समन्वय राखण्यासाठी २८८ विधानसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती केली आहे. तिन्ही पक्षात संपूर्ण समन्वय आहे. तिन्ही पक्षांनी आपापल्या वरिष्ठांना जागावाटप आणि उमेदवारीचे अधिकार दिले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे काम आमचे आहे. त्यात स्थानिक पातळीवर रूसवे फुगवे, नाराजी किंवा इच्छुकांत गैरसमज राहणार नाही याची जबाबदारी प्रत्येक पक्षाने आपापल्या मंत्री, नेते आणि आमदार, खासदारांवर दिली आहे. महायुती सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जात मते मागणार आहोत. विकासाच्या जोरावर निवडणूक लढविणार आहोत. अडीच वर्षातील कामे लोकांसमोर मांडणार आहे. ज्यांनी सत्ता असताना काही केले नाही, त्यांच्याकडून टीका होत राहणार. त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे शंभूराज देसाई म्हणाले.
लोकांना आता विकासकामे हवी आहेत. सततची टिकाटिप्पणी, टोमणे ऐकायची आता लोकांची इच्छा नाही. लोकांना आता त्यांना काय मिळत आहे हे महत्वाचे आहे. लोकांना मोफत सिलेंडर, लाईट बिल, सिंचन, महिला शिक्षण, मोफत उच्चशिक्षण, एसटीचा प्रवास, शहरी भागातील पायाभूत सुविधा मिळत आहेत. आम्ही महायुती म्हणून वज्रमुठ बांधली असून बहुमताच्या पुढचा आकडा गाठू असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. ते जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. यावेळी आमदार शिवाजी गर्जे, माजी खासदार आनंद परांजपे, महायुतीचे समन्वयक आशिष कुलकर्णी, भाजप माध्यम प्रभारी नवनाथ बन, उपस्थित होते.