

Maharashtra Politics
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोठी राजकीय रणनीती आखली आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांसाठी भाजपने आपली दारे खुली केली आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोकण आणि ठाणे विभागाच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्याचं सूत्रांकडून समजत आहे.
दिवाळी संपताच महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजणार हे स्पष्ट असतानाच पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. मतयंत्रांची संख्या पर्याप्त प्रमाणात असल्याने एकाच वेळी जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका घेणे शक्य असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान आयोगाची ही तयारी सुरू असतानाच राजकीय पक्षांनीही आपापली तयारी चालू केली आहे. भाजपच्या विभागीय मेळाव्यात पक्षसंघटनेच्या, स्थानिक कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत तसेच सरकार त्यांचे काम करण्यात मदतगार ठरते आहे काय, याचा आढावा घेतला जात आहे.
रणनीती काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, "भाजपमध्ये येण्यास जे कोणी इच्छुक असतील, त्यांना पक्षात घ्या. मात्र त्याचबरोबर, भाजपमध्ये 'इनकमिंग' करताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घ्या," अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. याचाच अर्थ, पक्ष वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रभावशाली नेत्यांना सामावून घेतानाच, जुन्या कार्यकर्त्यांचेही मनोधैर्य कायम ठेवण्यावर भाजपचा भर राहणार आहे. भाजपच्या या नव्या खेळीमुळे आता वसई-विरार, नवी मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या ठिकाणी भाजपमध्ये जोरदार 'इनकमिंग' होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.