

मुंबई : पंतप्रधान मुद्रा योजनेच्या नावाने एका व्यावसायिकाची फसवणूक झाली. दहा लाखांच्या कर्जासाठी प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी अज्ञात सायबर ठगाने सुमारे 33 लाख रुपये घेऊन गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या गुन्ह्यांचा तपास उत्तर सायबर सेलकडे सोपविण्यात आला आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते मालाड येथे राहतात. त्यांना व्यवसायासाठी दहा लाखांच्या कर्जाची गरज होती. त्यामुळे त्यांनी एका खासगी अॅपवर कर्जासाठी अर्ज केला होता.
यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन त्यांना पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज देतो असे सांगितले. कर्जासाठी त्यांनी त्यांचे वैयक्तिक अर्ज केला होता. त्यानंतर त्याने त्यांना त्यांचे कर्ज मंजूर झाल्याचे पत्र व्हॉटअपवर पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. या कर्जासह त्याच्यासह स्टेट बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करणार्या दुसर्या ठगाने त्यांच्याकडून टप्याटप्याने साडेनऊ लाख रुपये घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीत त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. या दोघांचेही मोबाईल बंद येत होते.
याच दरम्यान त्यांनी पैसे पाठविलेल्या एका व्यक्तीला कॉल केला आणि त्याने 18 लाख 73 हजार 700 रुपयांना गंडवले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलिसांसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
दुसर्यांदा केलेल्या प्रयत्नातही फसवणूक
याच दरम्यान त्यांनी पैसे पाठविलेल्या एका व्यक्तीला कॉल केला. त्याने तो एका अर्थपुरवठा कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. त्यांनी त्याला घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्याने त्यांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रोसेसिंगसह इतर कामासाठी 18 लाख 73 हजार 700 रुपये घेतले होते, मात्र त्यानेही त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. अशा प्रकारे कर्ज देण्याची बतावणी करुन या तिन्ही सायबर ठगांनी त्यांची 33 लाखांची फसवणूक केली.