मुंबई : पुढारी वृत्तसेवा
ईदच्या मिरवणुकीत डीजे डान्स, लेसर लाईट व लाऊड स्पीकरवर बंदी घाला, अशी विनंती करणारी याचिका मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने बुधवारी निकाली काढली. गणेशोत्सवासाठी लाऊड स्पीकरचा वापर हानिकारक असेल तर ईदसाठीही तो हानिकारकच असणार आहे, असे मत खंडपीठाने नोंदवले.
ईदच्या मिरवणुकीत लाऊड स्पीकर व लेसर लाईटवर बंदी घालावी, तसेच पालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी करत जुबेर पिरजादे यांनी अॅड. ओवेस पेचकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने कुराण किंवा इतर पवित्र पुस्तकांत कोणत्याही उत्सवासाठी डीजे सिस्टीम आणि लेसर लाईट वापरण्याची शिफारस करण्यात आलेली नाही, असा दावा करत न्यायालयाने दिलेल्या पूर्वीच्या आदेशात ईदचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी अॅड. पेचकर यांनी केली. जर लाऊड स्पीकर गणेश चतुर्थीसाठी हानिकारक असेल, तर तो ईदसाठीदेखील हानिकारक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट करून याचिका निकाली काढली.