

मुंबई : तलावांतून मुंबईला आवश्यक पाणीपुरवठा होत असतो. मात्र अनेकदा गळतीमुळे कमी दाबाने पुरवठा होत असतो. यासाठी महापालिकेने जलवाहिन्यांची कामे करण्याचे ठरवले आहे. यासाठी 5 कोटी 17 लाख रुपये खर्चाचे नियोजन केले असून दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे.
पहिल्या टप्प्यात पूर्व उपनगरातील कामे करण्यात येणार आहेत. यासाठी कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली असून दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. जलवाहिन्यांच्या कामांमध्ये चेंबरचेही काम करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. जलावाहिन्यामधून गळती थांबवण्यासाठी सध्या महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे कंत्राटदारामार्फत गळती थांबवण्याचे काम हाती घेण्यात येते. त्यामुळे जलवाहिन्यांमधून होणारी गळती लक्षात घेऊन, पालिकेने दैनंदिन वापरातील अत्यंत महत्वाच्या झडपांची पुर्नस्थापना, रस्त्यावर असलेल्या झडपांच्या चेंबर्सची बांधकामे व दुरूस्ती व चेंबर्सचे आवरण बदलणे, नवीन आवरण टाकणे अशी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत.
मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांसह अन्य कामे असून यासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात येतो. त्यामुळे जलवाहिन्यांची खोली काही ठिकाणी 8 ते 14 फुट असून काही ठिकाणी त्यांची खोली 20 ते 22 फुटही असते. त्यामुळे, उत्खनन कामाकरिता जे. सी. बी. वापरणे आवश्यक असते. परंतू बर्याचदा महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड, टाटा, रिलायन्स, अदानी आदी कंपनींच्या भुमिगत विद्युतवाहिन्यांमुळे उत्खननांसाठी जे. सी. बी. यंत्राचा वापर करणे जोखमीचे असते. यासाठी मनुष्यबळाचा वापर करून हे काम करावे लागते. त्यामुळे खर्चही वाढत असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.