मुंबई | Kirit Somaiya : आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे जतन करण्यासाठी जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कनिष्ठ न्यायालयाने तब्बल ५७ कोटी रुपयांच्या मदत निधीचा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला. तसेच या पिता-पुत्राची आणखी सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांना दिले.
अधिक चौकशीत आरोपी सोमय्या पिता-पुत्राने नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केल्याचे उघड झाले होते. मात्र कालांतराने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तक्रारदाराने गैरसमजुतीने तक्रार दाखल केली, असा अजब दावा करीत दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
या रिपोर्टची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. आरोपी सोमय्या पिता-पुत्राने नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केल्याचे तपासात उघड झाले होते. हा घोटाळा नसल्याचा पोलिसांचा दावा असेल तर मग सोमय्या पिता-पुत्राने गोळा केलेले पैसे गेले कुठे? ते पैसे राज्यपालांचे कार्यालय किंवा सरकारकडे जमा केल्याचा एकही पुरावा पोलिसांनी का सादर केला नाही? असे प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाने तपासावर ताशेरे ओढत क्लोजर रिपोट फेटाळला. तसेच किरीट सोमय्या व नील सोमय्या या पिता- पुत्रांची चौकशी करून नव्याने तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात जाण्याऐवजी तिची डागडुजी करण्यासाठी किरीट सोमय्या व पुत्र नील सोमय्या यांनी पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी मदत निधी जमवला. त्यातून सुमारे ५७ कोटींचा निधी जमा केला. या निधीचा सोमय्या पिता-पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप करून माजी सैनिक बबन भोसले यांनी ७ एप्रिलला तक्रार नोंदविल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला