

जोगेश्वरी : येथील एका निर्माणाधीन इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून पडून तीन कामगार जखमी झाले होते. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
जोगेश्वरी पूर्वेतील सोसायटी रोड जवळ देवभूमी कन्स्ट्रक्शनकडून इमारतीचे काम सुरू आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तिसर्या मजल्यावरून हे कामगार खाली पडले. या घटनेची माहिती मिळताच जोगेश्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ या कामगारांना महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरानी तपासून एकाला मृत घोषित केले तर दोघांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मध्यरात्री कामगार काम करत होते, का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मृत व जखमी कामगार 17 ते 18 वयोगटातील आहेत. त्यामुळे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी जून महिन्यात प्रकल्पाच्या जवळ रस्त्याने जाणार्या महिलेच्या अंगावर इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी झाल्याची घटना घडली होती.