नवी मुंबई : मान्सून माघारी फिरल्यानंतर नवी मुंबईत तापमानात चढउतार सुरू झाला आहेत. दिवसा वाढलेला उष्मा आणि रात्री जाणवणारा गारवा यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक नागरिकांना ही लक्षणे आठवडाभरापेक्षा अधिक काळ जाणवत असून त्यामुळे त्रास वाढला आहे.
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे कीटकजन्य आजारांची साथ पसरली होती. आता पावसानंतर हवामानात झालेल्या बदलामुळे व्हायरल संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. सतत येणार्या शिंका, सर्दी-खोकला, घसादुखी, थकवा, अंगदुखी यांसारख्या तक्रारी रुग्णांमध्ये सामान्यपणे दिसत आहेत. हवामानात अचानक होणार्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. पुरेशी झोप, संतुलित आहार, आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लक्षणे दीर्घकाळ टिकल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधोपचाराचा पूर्ण कोर्स करावा, असा सल्ला फिजिशिअन डॉ. प्रतीक तांबे यांनी दिला आहे.