

मुंबई : राज्यातील ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिला आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा 'कार्यक्रम' करणार आहे. आतापर्यंत बाई माणसाकडे पैसे मागायची, आता माणूस बाईकडे पैसे मागु लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचे हात सक्षम केल्यामुळे हा चमत्कार झाला आहे, असा दावा शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
शिवसेनेच्या आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात ते बोलत होते. महायुतीचे सरकार जनतेसाठी काहीच करत नाही, असा आरोप उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवाजी पार्क मेळाव्यातून केला. त्यास उत्तर देत पाटील म्हणाले, 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे' अशी राऊत यांची अवस्था आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना आणली. गोरगरिबांना सणासुदीच्या दिवसात आनंदाचा शिधा, ग्रामीण भागात आपला दवाखाना सुरू केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीतून केवळ अडीच कोटी रुपये दिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे सव्वाशे कोटी रुपये वाटप केले. तरीही या सरकारने काय केले असा प्रश्न राऊत विचारत आहेत, अशा शब्दात गुलाबरावांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
राऊत बाळासाहेबांची अॅक्टींग करतात. मफलर फिरवतात. गालावर हात ठेवतात. त्यांना आता कोणी प्रतिस्पर्धी उरलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता आपलाच नंबर आहे, असे वाटून घेणारे राऊत कधी ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीत निवडून आले नाहीत. उलट आमच्याच मतांवर ते खासदार होतात. गद्दार हा त्यांचा कॉमन शब्द आहे. विकासाबाबत त्यांच्याकडे शब्द नाहीत. गद्दार, खोके हे शब्द आता गुळगुळीत झाले आहेत. हे कोण होते, कसे वर आले, कोणाच्या मतांवर खासदार झाले हेही सांगा. गद्दारांची मते घेतली म्हणून दिल्लीत गेलेल्या राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन खुद्दारी दाखवावी, असे आव्हान पाटील यांनी दिले.
शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर महाविकास आघाडीचा भगवा फडकणार आहे, असा दावा केला. मागील अडीच वर्षात महायुतीने केलेले काम आणि २५० लोकाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन कदम यांनी केले.
शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांचा रंग बदलणारा सरडा, असा उल्लेख केला. एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा बाप चोरला म्हणणाऱ्या उद्धव यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भगवा रंग बदलणारे आता मातोश्री नाव बदलून अम्मीजान ठेवणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा आहे. पण तुमच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना कार्ट म्हणता मग तुमच्या मुलाला कार्टून म्हणायचे का, असा सवाल वाघमारे यांनी केला.