मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी २४ तारखेपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पादाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या याच दौऱ्यात जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. महायुतीत जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. महायुतीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची चर्चा आहे. मात्र काही जागांवर मतभेद आहेत. अमित शाह २४ आणि २५ सप्टेंबरला नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यात ते भाजप नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतील. २४ सप्टेंबरला नागपूर येथील रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात विदर्भातील आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, तालुका अध्यक्षापासून सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. संभाजीनगर येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अमित शहा जागावाटपावर चर्चा करतील, असे समजते.