मुंबई : ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर झाल्यानंतर तत्काळ अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होण्याची गरज होती. मात्र यासंदर्भात काहीच हालचाली झालेल्या नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याच्या हालचाली सुरू असून त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत विलंबाची शक्यता आहे.
राज्य सरकारने यंदाच्या अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेत तीनऐवजी चार फेर्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर पदवी अभ्यासक्रमातही हा बदल करण्याचा विचार सुरू आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या संदर्भातील माहिती माध्यमांना दिली होती. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नाही. परिणामी, प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सुरुवात होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रवेशाची माहितीपुस्तिका आणि सुधारित वेळापत्रक अद्याप सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
सीईटी निकालानंतर प्रवेश प्रक्रियेच्या हालचाली लवकर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून झालेला नाही. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य सरकारकडून प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील नियम व माहितीपुस्तिका उपलब्ध होताच प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले.