

नवी दिल्ली : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून निम्म्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्याचे समजते. तसेच ठाणे, कल्याण महापालिकेत शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. त्यामुळे या महापालिकांमध्ये 70 टक्के जागा भाजपने द्याव्यात, अशी मागणीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे कळते. शनिवारी ते दिल्ली दौर्यावर होते.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती भक्कम राहिली पाहिजे, त्याचवेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये समसमान जागावाटप व्हावे, असा आग्रह यावेळी शिंदे यांनी धरला.
शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती. पंतप्रधान मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. एनडीएमधील सर्व घटक पक्ष हे विचाराने एकत्र आलेले पक्ष आहेत. आघाडी अशीच भक्कम राहावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींकडून शिवसेनेला नेहमीच आदराचे स्थान मिळाले आहे. बाळासाहेबांच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. चर्चा खेळीमेळीत झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. कार्यकर्ते आणि प्रत्येक भागातील नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढावी, असे वाटते. मात्र महायुतीचे वरिष्ठ नेते यासंबंधी अंतिम निर्णय घेतील. नेत्यांनी एकदा निर्णय घेतल्यावर कार्यकर्ते ऐकतात, असे ते म्हणाले.
रवींद्र धंगेकर यांच्याविषयी बोलताना शिंदे म्हणाले, महायुतीत मिठाचा खडा पडता कामा नये, असे धंगेकरांना सांगितले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. धंगेकरांशी बोलणार आहे. ते मला भेटणार आहेत, असे शिंदे म्हणाले.
पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेत राज्यात सुरू असलेल्या विकासकामांबाबत चर्चा झाली. काही प्रकल्पांची स्थिती पंतप्रधानांनी जाणून घेतली. ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत पंतप्रधान आग्रही आहेत. महाराष्ट्रातल्या पूरस्थितीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. शेतकर्यांना दिली जाणारी मदत आणि सध्याची स्थिती एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातली. केंद्र सरकार शेतकर्यांच्या पाठीशी असून योग्य ती मदत दिली जाईल असे आश्वासन मोदी यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.