मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला भरमसाट सवलतींसह बहाल करण्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत पुन्हा तापणार असतानाच धारावी बचाव आंदोलनाने अदानी हटावच्या मुद्यावर या निवडणूक रिंगणात उडी घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यासोबतच आता उद्धव यांच्या शिवसेनेनेही धारावीवर दावा सांगितला असून, जागावाटपात तो मान्य झाल्यास धारावी बचाव आंदोलन आणि शिवसेनेसह महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून बाबुराव माने यांचे नाव पुढे आले आहे.
सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या या वडिलोपार्जित मतदारसंघात आपली बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांना तिकीट मिळवण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. मात्र, गायकवाड घराण्याची लाडकी बहीण योजना नको, अशी भूमिका घेत काँग्रेसच्या तब्बल १८ इच्छुकांनी उमेदवारीसाठीचे फॉर्म भरले आहेत. काँग्रेसमध्ये हा गोंधळ सुरू असताना जागावाटपात प्रसंगी मुंबईतील अन्य मतदारसंघ काँग्रेसला देत धारावीची जागा मिळवण्याची ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना धारावी सोडणार नाही, असे शिवसे- नेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. धारावीच्या बदल्यात शिवसेना मुंबईतील कोणता मतदासंघ सोडणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे धारावी बचाव आंदोलनाचे एक शिष्टमंडळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असून, शिवसेनेने धारावी मतदारसंघ घ्यावा आणि आंदोलनाचेही प्रतिनिधी म्हणून बाबुराव माने यांना उमेदवारी द्यावी, अशी भूमिका या भेटीत मांडली जाईल. त्याजोडीलाच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीचीही तयारीही चालवल्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात धारावी हा अदानीच्या प्रकल्पासारखाच एक मोठा पेच ठरू पाहत आहे.