

मुंबई : ‘आम्हाला नवीन कबुतरखाने नकोत, महापालिकेने फक्त दादरचा कबुतरखाना उघडावा, अन्यथा मरते दम तक वो हम खोलके रहेंगे’, असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. मला आझाद मैदानाची परवानगी मिळाली आहे. मी जीवदयेसाठी उपोषणावर ठाम राहणार असून 3 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती देखील निलेशचंद्र विजय यांनी दिली.
मुंबई महापालिकेने कबुतरांना नुकतेच चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिल्यानंतर आता पुन्हा जैन समाज आक्रमक झाला आहे. या संदर्भात बोलताना जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले, की मागील काही दिवसांतील घटना पाहता चिंतन करावे लागेल. न्यायालयाचा आदेश असला तरी सरकारला मार्ग काढण्यासाठी सांगितले आहे. मात्र तरीही तोडगा काढला जात नाही. जीवदया फक्त जैन समाजासोबत जोडत आहे. मात्र तसे नसून, प्रत्येक व्यक्ती कबुतरांना दाणे टाकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दादर कबुतरखान्याची ताडपत्री काढणार!
पुण्यातील बोर्डींग, विलेपार्लेतील मंदीर प्रकरण बघून कबुतरांच्या विषयावर चिंतन करण्याची गरज आहे. नवीन कबुतरखाने तुम्ही का देता, आम्हाला आमचे जुने कबुतरखाने पाहिजेत. फक्त जैन नाही, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीचा हा विषय आहे. दादरच्या कबुतरखान्याची ताडपत्री आम्ही काढूनच गप्प बसू असा इशाराही निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.