

मुंबई : प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या 2.83 कोटीच्या पेमेंटचा अपहार करून एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी मितेश भरत शाह या व्यावसायिकाला मालाड पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासोबत त्याची पत्नी कोमल मितेश शाह ही सहआरोपी आहे.
कांदिवली येथे राहणारे तक्रारदार व्यावसायिक असून त्यांची कंपनी प्लास्टिकच्या कच्च्या मालाची विक्री करते. दोन वर्षांपूर्वी त्यांची मितेशशी ओळख झाली होती. मितेशने त्याची स्वत:ची कंपनी असून कच्च्या मालासाठी त्याने त्याच्यासोबत व्यवहार करावा. या व्यवहारातून त्याला चांगला फायदा होईल, असे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने त्याच्याशी व्यवहार सुरू केला. ठरल्याप्रमाणे त्याने त्याला सुरुवातीला 29 लाखांच्या मालाची डिलीव्हरी केली.
याच दरम्यान त्याने त्यांना अॅमेझॉन आणि डिमार्ट कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी त्याला तीस दिवसांच्या क्रेडिटवर कच्चा माल पाठविण्याची विनंती केली. यावेळी तीस दिवसांत त्यांचे संपूर्ण पेमेंट करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी त्याला मार्च ते मे 2024 या कालावधीत 4 कोटी 26 लाख 97655 रुपयांच्या मालाची डिलीव्हरी केली. त्यापैकी काही रक्कम त्याने त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली. मात्र 2.83कोटींचे पेमेंट दिले नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मितेश व कोमल शाह यांच्यासह त्यांच्या कंपनीची माहिती काढण्यास सुरुवात केली. मितेश व कोमल यांच्याकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली.