

विरार: पहाटेच्या काळोखात विरार पश्चिमेकडील अर्नाळा गावाचा शांत कोपरा असलेल्या बंदरपाड्यात रक्ताचे शिंतोडे उडाले आणि संपूर्ण गाव हादरले आहे. कुटुंबाच्या घरात घुसून एका नराधमाने झोपलेल्या आई आणि मुलीवर केलेल्या भीषण हल्ल्याने परिसरात भीती, संताप आणि असुरक्षिततेची लाट उसळली आहे.
अर्नाळा गाव जे आजपर्यंत आपल्या शांततेसाठी आणि सुरक्षिततेसाठी ओळखले जात होते, त्याच गावात आता दहशतीचे सावट पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास काळ्या जिन्स आणि निळ्या टी-शर्टमध्ये असलेल्या एका अज्ञात तरुणाने गोवारी कुटुंबाचे घर लक्ष्य केले.
प्राध्यापक सचिन गोवारी यांच्या मूळ घरी त्यांची आई लीला गोवारी आणि बहीण नेत्रा गोवारी होत्या. पहाटेच्या शांततेत गाढ झोपलेल्या नेत्रा यांच्यावर या अज्ञात हल्लेखोराने धारदार कातीने अचानक हल्ला केला. मुलीचा जीवघेणा आरडाओरडा ऐकून आई लीला गोवारी मदतीसाठी धावल्या. माणुसकी विसरलेल्या त्या हल्लेखोराने त्यांच्यावरही निर्दयीपणे वार केले. दोन्ही माय-लेकी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. सकाळ झाल्यावर जेव्हा ही भयानक घटना उघडकीस आली, तेव्हा संपूर्ण गावावर शोक आणि संतापाची गडद छाया पसरली. अर्नाळ्याच्या इतिहासात इतका भयंकर आणि थरारक प्रसंग पहिल्यांदाच घडल्यामुळे ग्रामस्थ स्तब्ध झाले आहेत.
या घटनेमुळे शांत आणि सुखी मानले जाणारे अर्नाळा गाव आता असुरक्षिततेच्या गर्तेत आले आहे. गावाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. विशेषत: केवळ थोडेसे भाडे मिळवण्यासाठी कोणतेही ओळखपत्र (ID proof) न घेता बाहेरील लोकांना भाड्याने घरे देण्याच्या प्रथेवर ग्रामस्थांनी बोट ठेवले आहे.
"अशा घटनांना अनधिकृत भाडेकरू आणि त्यांच्यावर नसलेले नियंत्रण हेच जबाबदार आहेत," असा सूर आता गावात उमटत आहे. "गावात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काटेकोरपणे नोंद ठेवा, अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती होईल," असा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गावकरी आता पोलीस प्रशासनाकडे केवळ 'कारवाई' नव्हे, तर 'ठोस कारवाई'ची मागणी करत आहेत. गावात सुसंघटित तपासणी मोहीम आणि भाडेकरूंवर कठोर देखरेख ठेवल्याशिवाय गावाला पुन्हा शांतता लाभणार नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.