

मुंबई, नागपूर : उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे... अशी भावना, कृतज्ञता व्यक्त करत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती सोमवारी राज्यात अपूर्व उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, रक्तदान शिबिर, प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याचबरोबर विविध ठिकाणी सायंकाळी मिरवणुकाही काढण्यात आल्या. चैत्यभूमीवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त केली. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह विविध शहरांत, गावांत आंबेडकर जयंतीचा उत्साह होता. नागपुरातील दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठी गर्दी झाली. संविधान चौकात प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर राज्य सरकारकडून आयोजित अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही भाषणे ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने महायुतीत नाराजीनाट्य रंगले. एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आल्याने शिवसेनेत संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, यांची प्रमुख उपस्थिती होती.