मुंबई : महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका आजवर मांडणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीनंतर छोट्या पक्षाच्या (कमी आमदार असलेल्या) नेत्यासही मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते, असे वक्तव्य करीत नवे राजकीय संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे व शिवसेना आग्रही असताना चव्हाणांच्या वक्तव्याच्या रूपाने काँग्रेसने सध्या या प्रकरणी नरमाईची भूमिका घेतल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एका अर्थाने ठाकरे गटाला शांत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे हे मानले जात आहे.
पुढारी वृत्तसमूहाच्या ‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित ‘पुढारी न्यूज महासमिट’ येथे गुरुवारी प्रकट मुलाखतीत बोलताना चव्हाण यांनी हे संकेत दिले. या सोहळ्यात ‘पुढारी न्यूज’चे अँकर अमोल जोशी यांनी मुलाखत घेतली.
सध्या राज्यातील महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा कळीचा मुद्दा ठरला आहे. याबाबतच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू नये, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मी पक्षाची भूमिका मांडली. 1995 मधील शिवसेना-भाजप युतीचे सरकार असेल किंवा 1999 पासूनचे महाआघाडीचे सरकार असेल, यावेळी सर्वाधिक संख्या असलेल्या आमदारांच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले गेले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
2019 मध्ये आघाडीत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार होते म्हणून त्यांना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपद दिले गेले. केवळ शिवसेनेपेक्षा दोन आमदार कमी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी खूप इच्छा होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला!
सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले जाते हा महाराष्ट्रातील राजकीय संकेत आहे. सरकारच्या स्थैर्यासाठी सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपद देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे मी भूमिका मांडली. पण दिल्लीत घटक पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या पक्षाला डावलून छोट्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते, असे राजकीय भाकीत चव्हाण यांनी केले.
मराठा आरक्षणाबाबत चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. 1902 मध्ये शाहू महाराज यांनी मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण दिले. मराठा समाजाला कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये आरक्षण आहे. पण महाराष्ट्रात आरक्षण नसल्याने मराठा समाजात आक्रोश आहे. मी मुख्यमंत्री असताना राणे समिती नेमून जुलै 2014 मध्ये मराठा समाजास 16 टक्के आरक्षण अध्यादेशाद्वारे दिले. सध्या महायुती व भाजप नेत्यांकडून मराठा समाजाला सर्वप्रथम फडणवीस सरकारने आरक्षण दिल्याची खोटी माहिती वा प्रचार केला जात आहे.
कुणबी मराठा हा ओबीसीत गणला जातो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जरांगे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काय ठरले आणि काय बिनसले, असा सवाल चव्हाण यांनी केला. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, ही काँग्रेसची भूमिका आहे. मराठ्यांना वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल, असे केले तर महाराष्ट्रात मराठा, इतर राज्यात जाट, लिंगायत, अशा जातींनाही आरक्षण देता येईल, असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आघाडीला किती जागा मिळतील, यावर ते म्हणाले, लोकसभेचा निकाल बघता विधानसभेला 185 जागा आघाडी जिंकेल. विदर्भात काँग्रेस जोमात आहे. मराठवाड्यातही काँग्रेस व महाविकास आघाडीची स्थिती सर्वोत्तम आहे. उर्वरित राज्यात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. पक्षात कोणत्याही नेत्यांमध्ये संघर्ष नाही. त्यामुळे काँग्रेसला सर्वात चांगले यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाबद्दल चव्हाण यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, वडील आणि आजीच्या हत्येनंतर राहुल गांधी हे एका विशिष्ट वातावरणात वाढले. त्यांना इतर मुलांसारखे लोकांमध्ये मिसळता आले नाही. त्यांनी पक्षाच्या पडत्या काळात नेतृत्व स्वीकारले. दोनवेळा पराभव झाला. पण ते खचले नाहीत. भारत जोडो यात्रेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणखी बदल झाला. आता ते देशाचे विरोधी पक्षनेते आहेत व 2029 मध्ये ते पंतप्रधान होण्यास सज्ज आहेत. अर्थात सत्तेत आल्यास सर्व मित्रपक्ष मिळून कुणाला पंतप्रधान करायचे ते ठरेल, असे ते म्हणाले.