१० हजार कर्मचार्‍यांना एसटी चे दरवाजे बंद? | पुढारी

१० हजार कर्मचार्‍यांना एसटी चे दरवाजे बंद?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या 71 दिवसांपासून संपावर गेलेल्या एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांपैकी 10 हजार कर्मचार्‍यांना एसटीचे दरवाजे बंद झाल्याचे चित्र आहे.

एसटी महामंडळाने निलंबन आणि बडतर्फीच्या कारवाईचा बडगा उगारताच अनेक कर्मचार्‍यांनी आगारात जाऊन रुजू करून घेण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. मात्र मध्यवर्ती कार्यालयाने कोणतीही सूचना दिली नसल्याने आगारप्रमुखांनी या कर्मचार्‍यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. परिणामी, या कर्मचार्‍यांवर बडतर्फीच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. आतापर्यंत 11008 कर्मचार्‍यांचे निलंबन केले असून 783 कर्मचार्‍यांना बडतर्फ केले आहे, तर 2047 एसटी कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

बडतर्फ कर्मचार्‍यांना पुढील नव्वद दिवसांत एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अपील करावे लागते. अन्यथा जिल्हा कामगार न्यायालयामध्ये या बडतर्फी विरोधात दाद मागावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने या काळात नोकरी नाही आणि पगारही नाही, अशा स्थितीत दहा हजार कर्मचार्‍यांना एसटीचे दरवाजे पुन्हा उघडण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत बसावे लागणार आहे.

Back to top button