आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, गर्दी रोखणारे निर्बंध लवकरच! | पुढारी

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, गर्दी रोखणारे निर्बंध लवकरच!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत एका दिवसात झालेलीदुप्पट वाढ चिंताजनक असून, ठिकठिकाणी उसळणारी गर्दी रोखण्यासाठी नव्याने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय एक-दोन दिवसांत घेतला जाईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: हा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

या वाढत्या संसर्गाची दखल घेत गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी टास्क फोर्स सदस्य आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. सुमारे दोन चाललेल्या या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचे चित्र मांडले.

महाराष्ट्रातील संसर्ग दरात वाढ

या बैठकीनंतर माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, एका दिवसात रुग्णवाढ जर दुप्पट होत असेल तर ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्रात आठवड्याचा संसर्ग दर अचानक वाढल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रातही नमूद केले आहे.

Back to top button