ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव : गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा! | पुढारी

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव : गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. विशेष म्हणजे केंद्र सरकारने राज्यांना पाठवलेल्या पत्रातही गरज पडल्यास परिस्थितीनुसार रात्रीची संचारबंदी लावा, असे निर्देश दिले आहेत.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीवर झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधले. कोरोना आणि आता ओमायक्रॉन रोखण्यासाठी केंद्र मोठा निर्णय घेऊ शकते, असे ते म्हणाले. सभागृहात मास्क न लावणार्‍या आमदारांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या. आपण चार ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारे विधिमंडळाचे सदस्य आहोत. काही ठराविक सदस्य सोडले तर अजिबात इथे कोणी मास्क लावत नाही, मास्क लावा, जीवन महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

केंद्राचे राज्यांना पत्र

दरम्यान, कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्केपेक्षा जास्त असेल तसेच ऑक्सिजनयुक्‍त बेडची गरज 40 टक्केपेक्षा जास्त वाढल्यास स्थानिक प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ लागू करावेत. गरज पडल्यास स्थानिक परिस्थितीनुसार रात्रीची संचारबंदीही लावावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी राज्यांना पाठवलेल्या पत्रात दिले.

देशात 325 ओमायक्रॉनबाधित

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या गुरुवारी 325 वर पोहोचली. तामिळनाडू 33, तेलंगणा 14, कर्नाटक 12 आणि केरळमध्ये पाच केसेस आढळल्या. सध्या सर्वाधिक 65 केसेस महाराष्ट्रात असून यातील 34 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्राखालोखाल दिल्ली 64 आणि तेलंगणा 38 यांचा क्रम लागतो.

केंद्राच्या सूचना

* आवश्यक तेथे किमान 14 दिवस निर्बंध लावावेत
* जास्त धोका असलेल्या ठिकाणी रात्रीची संचारबंदी
* आगामी उत्सवांच्या आधी कडक नियम लावावेत
* सर्व जिल्ह्यांत डेल्टा, ओमायक्रॉन रुग्णसंख्येवर बारीक लक्ष ठेवा
* रुग्ण पॉझिटिव्हिटी, दुप्पट दर असलेल्या ठिकाणांचा आढावा घ्या
* नव्याने जास्त रुग्ण वाढणार्‍या ठिकाणी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय

Back to top button