शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे सेक्स्टॉर्शन करण्याचा प्रयत्न | पुढारी

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे सेक्स्टॉर्शन करण्याचा प्रयत्न

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सेक्स्टॉर्शनद्वारे शिवसेनेच्या आमदाराला धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला अशाच प्रकारे एका अज्ञात महिलेने अश्‍लील व्हिडीओ कॉल करून पैशांची मागणी केल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंविसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आमदार प्रकाश सुर्वे दहिसर परिसरात राहतात. आमदार असल्यामुळे विविध कामांसाठी त्यांना अनेक लोकांचे फोन आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज येतात. गेल्या महिन्यातील अकरा तारखेला रात्री सव्वानऊ वाजता त्यांना एका अज्ञात मोबाईलवरून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर हॅलो हाऊ आर यू असा मॅसेज आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी दुपारी तीन वाजता पुन्हा त्याच मोबाईलवरून त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर हाय असा मॅसेज आला हातेा. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

16 नोव्हेंबरला पुन्हा त्यांना एक मॅसेज आला. त्यात अज्ञात व्यक्तीने त्यांना हॅलो, क्या हुआ जी असा मॅसेज पाठवला होता. त्यानंतर त्यांना संबंधित व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला, मात्र त्यांनी तो कॉल घेतला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा दुसरा कॉल केला असता त्याने तो कॉल घेतला. यावेळी समोर एक महिला होती.

ही महिला आपले कपडे काढून त्यांच्यासमोरच अश्‍लील हावभाव करू लागली. त्यामुळे प्रकाश सुर्वे यांनी तो कॉल बंद केला होता. त्यानंतर त्यांनी प्लीज डोन्ट कॉल मी, अदरव्हाईस आय विल कम्प्लेंट टू पोलीस स्टेशन असा मॅसेज पाठवला होता. यावेळी या महिलेने त्यांच्या व्हिडीओ कॉल मॉर्फ करून त्याचा एक व्हिडीओ तयार करून त्यांना पाठवून त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

Back to top button