अनिल देशमुख यांच्या बंगल्यावरील सात पोलिसांचा घेतला जबाब | पुढारी

अनिल देशमुख यांच्या बंगल्यावरील सात पोलिसांचा घेतला जबाब

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटी वसूली, भ्रष्टाचारख्, गैरकारभाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी मुंबई पोलीस दलातील सात पोलिसांकडे कसून चौकशी करत जबाब नोंदविल. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना हे सातही पोलीस त्यांच्या बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने सुरुवातीला याप्रकरणाशी संबंधीत बहुतेकांकडे कसून चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवले.

मात्र मधल्या काळात सीबीआयचा तपास थंडावला होता. त्यानंतर सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र ते अद्यापही चौकशीला हजर राहिलेले नाहीत.

सीबीआयने याच दरम्यान ऑक्टोबरच्या अखेरीस संतोष जगताप याला ठाण्यातून अटक केली. देशमुखांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या बदल्या आणि पोस्टींगमध्ये जगताप हा मध्यस्थ होता, अशी माहिती मिळते. या गुन्ह्यातील ही पहिलीच अटक होती. त्याच्या घरावर करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये 9 लाख रुपयांची रोख रक्कम सीबीआयच्या हाती लागली होती. त्यानंतर आता सीबीआयने देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या सात पोलिसांकडे शुक्रवारी चौकशी केली.

सीबीआयने या आधी संबंधीतांच्या नोंदविलेल्या जबाबातून मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासोबतच त्या भेटींवेळी नेमके कोण-कोण उपस्थित असायचे. याबाबत माहिती घेत सीबीआयने या सात पोलिसांचा जबाब नोंदविल्याची माहिती मिळते.

Back to top button