मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पोलीस विभागातील १७ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी तब्बल १७ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुला-मुलींच्या राहण्याची काहीही सोय नाही, त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. भरपावसात पोलीस भरती सुरु असून या भरतीसाठी आलेल्या मुलांना पावसात रस्त्याच्या कडेला, उड्डाण पुलाखाली आसरा घ्यावा लागतो. पोलीस भरतीसाठी आलेल्या या मुलांची राहण्याची व इतर व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री देवेंद फडणवीस आणि राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांना फोन करून या मुलांच्या राहण्याची सोय करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यसेवा २०२४ साठी डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी या पदासहित सर्व संवर्गाच्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात. जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेत गोरगरीब मुलांना न्याय द्यावा. कर सहायक प्रतिक्षा यादीमधील मुलांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यासह सर्व रिक्त पदांची जाहिरात काढून सर्व पदे भरावीत, अशीही मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा :