ममता बॅनर्जी : काँग्रेसला वगळून ममतांच्या मुंबईत राजकीय भेटीगाठी | पुढारी

ममता बॅनर्जी : काँग्रेसला वगळून ममतांच्या मुंबईत राजकीय भेटीगाठी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मुंबई दौर्‍यावर आलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रात भाजपविरोधात तिसरी आघाडी उभारण्याच्या पर्यायावर चर्चा केली. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बुधवारी चर्चा केली. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी चर्चेपासून दूर ठेवले.

एवढेच नव्हे, तर परदेशात राहून देशाचे नेतृत्व कसे करणार, असा टोला राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला. त्यामुळे भाजपविरोधात आघाडी उभारण्यापूर्वीच काँग्रेस आणि इतर पक्षांतील मतभेद पुढे आले आहेत. काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आघाडीत स्थापनेपूर्वीच वादाची बत्ती लागली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारपासून मुंबई दौर्‍यावर असलेल्या बॅनर्जी यांनी बुधवारीही विविध राजकीय पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. एक तास ही बैठक चालली.

बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत, देशाचे भावी नेतृत्व कोण करेल, कोणकोणत्या पक्षांची एकी होईल, याविषयी काही संकेत दिले. ममतांसोबतच्या भेटीत काय झाले, असा थेट प्रश्‍न केला असता, सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे. लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीकरिता सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभारण्याची गरज आहे. याच हेतूने बॅनर्जी यांनी हा दौरा केला. या बैठकीत त्यांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली, असे पवार म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या एकाही नेत्याची भेट घेतली नाही, त्यामुळे तुमच्या आघाडीमधून काँग्रेसला वगळणार का, यावर उत्तर देताना पवार यांनी, काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे बोलून त्यांनी प्रश्‍नाला बगल दिली.

काँग्रेस आणि डावे आपल्याविरोधात विधानसभा निवडणुकीत लढू शकतात, तर आम्हीही त्यांच्याविरोधात जाऊ शकतो. भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला लढावे लागेल. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर भाजपचा पराभव करणे शक्य आहे, असा दावाही त्यांनी केला. आपल्या दौर्‍यात ममता यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्याविरोधात वक्‍तव्य केल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज आहेत. तर भाजपने या दौर्‍यावर टीका केली.

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्‍त केले. ते म्हणाले, पश्‍चिम बंगाल व महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वाधिक योगदान या दोन राज्यांनी दिले आहे. संपूर्ण देशाला दिशा देण्याचे काम या दोन्ही राज्यांनी कायम केलेले आहे. आजही ही दोन्ही राज्ये राष्ट्रीय प्रवाहात एक वेगळी भूमिका घेऊन उभी आहेत. शरद पवार व ममता बॅनर्जी या प्रवाहाचे नेतृत्व करत आहेत, अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्‍त केली.

‘यूपीए’ अस्तित्वात नाही : ममतांचे टीकास्त्र

बॅनर्जी यांनी आपल्या दौर्‍यात शिवसेना नेत्यांशी चर्चा केली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाही. याबाबत विचारले असता, आता ‘यूपीए’ अस्तित्वात नसल्याचा टोला बॅनर्जी यांनी लगावला. तुम्ही फिल्डवर राहणार नाही, तर भाजप तुम्हाला बोल्ड करेल. तुम्ही मैदानात उतराल, तर भाजपचा पराभव होईल, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

Back to top button