
पुढारी ऑनलाईन डेस्क : भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावात प्रचार करून परतत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. हा घातपाताचा डाव होता, असा आरोप काँग्रसने केला आहे. पटोले यांनी अपघाताची माहिती देताना हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? याची पोलीस चौकशी करतील, असे म्हटले आहे.
मंगळवारी रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा संपवून राहत्या गावी सुकळी येथे जाताना भिलेवाडा जवळ माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? पोलीस याची चौकशी करतील. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम व परमेश्वराच्या कृपेने मी सुखरूप आहे. काळजी नसावी, असे पटोले यांनी व्हिडोओ संदेशात म्हटले आहे.
पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकनं जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक्स पोस्टवरून नाना पटोले यांच्या घातपाताचा डाव होता, असा आरोप केला आहे. नाना पटोले यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला. त्यांचा घातपात करण्याचा डाव होता. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने त्यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल लोंढे यांनी केला आहे.
हेही वाचा :