दोन लस धारकांनाच ‘बेस्ट’ प्रवासाची मुभा | पुढारी

दोन लस धारकांनाच ‘बेस्ट’ प्रवासाची मुभा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण आफिक्रेच्या ओमायक्रॉन व्हेरियंंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नवीन नियमावलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून दोन लस मात्रा घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने सर्व आगार व बस थांब्यांवरुन सुटणार्‍या बसमधून प्रवासासाठी मंगळवार 30 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास किंवा दोन लस मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांनाच बेस्टने प्रवास करता येणार आहे. परंतु या प्रवाशांचे प्रमाणपत्र तपासण्याचे अतिरिक्त काम वाहकांना करावे लागणार आहे. यामुळे वाहकांवरील ताण वाढणार असल्याने काहीशी नाराजी व्यक्त होत आहे.

नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्याचे बेस्ट उपक्रमाने सर्व आगार प्रमुखांना आदेश दिले असून त्यांच्यामार्फत तिकीट तपासणीस, वाहक आणि चालक यांनाही सूचना केल्या आहेत. बस थांब्यावर असलेल्या वाहकाकडून प्रवाशांना तिकीट देण्याआधी प्रवाशाकडील युनिव्हर्सल पास किंवा दोन लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र तपासले जाईल. यासाठी तिकीट तपासणीसाचीही मदत घेतली जाणार आहे. त्यानंतरच प्रवाशांना बेस्टने प्रवास करता येईल.

या तपासणीसाठी कर्मचार्‍यांची संख्याही काहीशी वाढवण्यात येणार आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी मुंबईतील सर्व आगार, बस थांब्यांवर होणार होती. परंतु उपनगरातील मागाठाणेसह काही मोजक्याच आगार व थांब्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. परंतु प्रवाशांनी याला काहीसा विरोध केला. तर काही आगार व थांब्यांवर याची अंमलबजावणी झालीच नाही. वरिष्ठांकडून यासंदर्भात कोणतेही आदेश आले नसल्याची माहिती काही वाहकांनी दिली. त्यामुळे मंगळवारपासून याची व्यवस्थित अंमलबजावणी होईल, असे बेस्टमधील अधिकार्‍यांनी सांगितले.

वाहकांवर अतिरिक्त ताण

या नियमाची अंमलबजावणी करताना गोंधळ उडण्याची शक्यता असून वाहकांवर या अतिरिक्त कामाचा ताण पडणार आहे. निर्बंध शिथिल झाल्याने बेस्टची प्रवासी संख्या 26 लाखांपर्यंत पोहोचली आहे. काही आगार, बस थांब्यांवर सकाळी व संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. अशा वेळी दिवसभर अनेक प्रवाशांचे युनिव्हर्सल पास आणि दोन लसमात्रा प्रमाणपत्र तपासण्याचे आव्हान वाहकांपुढे आहे.

पास, प्रमाणपत्र तपासणी आणि तिकीट देण्याचे काम वाहकांना करावे लागणार आहे. त्यामुळे हे सगळेच एकाचवेळी कसे शक्य होईल, असा प्रश्न वाहकांनी उपस्थित केला आहे. तसेच या निर्णयामुळे बेस्टची प्रवासी संख्या घटून त्याचा उत्पन्नावरही परिणाम होउन गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बेस्टमध्ये 18 हजार चालक व वाहक कार्यरत आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचार्‍यांचे प्रमाण 90 टक्के आहे.

असा काढा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास

रेल्वे,बेस्ट,हवाई प्रवासासह मॉलमध्ये प्रवेशासाठी आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास आवश्यक आहे. ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत ती व्यक्ती स्वत: ऑनलाईनद्वारे पास काढू शकते.अनेक नागरिकांनी हा पर्याय निवडला आहे. मात्र युनिव्हर्सल पास मिळाल्यावर तो कसा व कुठे वापरायचा तसेच रेल्वे प्रवासात पुन्हा लसीच्या दुसर्‍या डोसचे प्रमाणपत्र,आधार कार्ड आदी कागदपत्रांची पडताळणी होईल का,त्यासाठी ही कागदपत्रे जवळ बाळगावी लागणार का आदी प्रश्न नागरिकांना आहेत.

असा मिळवा ई-पास

1.पात्र नागरिकांनी http://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
2. त्यातील ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन यावर लिंक करा.
3.त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा. त्यानंतर तात्काळ रजिस्टर मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड एसएमएसद्वारे प्राप्त होईल.
4.हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव,मोबाईल क्रमांक,लाभधारकाचा संदर्भ क्रमांक आदी तपशील आपोआप समोर दिसेल.
5. त्यामध्ये पास निर्माण करा (जनरेट पास ) या पर्यायवर क्लिक करावे
6. त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक आदी सर्व तपशील आपोआप दिसेल.
7. या तपशिलामध्ये सेल्फ ईमेज या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे.ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेर्‍याद्वारे सेल्फी काढूनदेखील अपलोड करता येईल
8. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील काही तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता एसएमएसद्वारे लिंक मिळेल.
9.लिंक आल्यानंतर ई-पास मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा.

Back to top button