समीर वानखेडे : वानखेडेंचा अब्रुनुकसानीचा दावा; एकल न्यायालयाचा निर्णय रद्द - पुढारी

समीर वानखेडे : वानखेडेंचा अब्रुनुकसानीचा दावा; एकल न्यायालयाचा निर्णय रद्द

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : क्रूझ ड्रग्ज पार्टीच्या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर नबाब मलिक यांनी विविध आरोप केले. त्यानंतर मलिक यांच्याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अबु्रनुकसानीच्या दाव्यावर एकल न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी रद्द केला.

ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक यांनी या एकल न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिल्याने न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने उभय याचिकाकर्त्यांच्या संमतीने हा निर्णय रद्द केला. या दाव्यावर नव्याने सुनावणीने घेऊन 12 आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. दरम्यान नवाब मलिक यांनी दाव्यावर निर्णय होईपर्यंत वानखेडे यांच्याविरोधात कोणतेही आक्षेपार्ह विधान अथवा आरोप करू नयेत, असेही खंडपीठाने बजावले.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी दरदिवशी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.

त्याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावरील सुनावणीवेळी पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेबाबत कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी नवाब मलिकांकडून देण्यात आली. त्यानंतर मलिक यांनीही एकल न्यायालयाने निकालात जे ताशेरे ओढले त्यावर आक्षेप घेत निकाल रद्द करण्याची विनंती करत याचिका दाखल केली. त्यावर वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.

Back to top button