ST Employees strike : १९ हजार एसटी कर्मचारी रुजू | पुढारी

ST Employees strike : १९ हजार एसटी कर्मचारी रुजू

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी (ST Employees strike ) कर्मचार्‍यांचा संप सुरूच आहे. कर्मचार्‍यांना 41 टक्के वेतनवाढ आणि निलंबनाची कारवाई सुरू केल्यानंतरही महामंडळात कामावर हजर होणार्‍या कर्मचार्‍यांच्या संख्येत मंद गतीने वाढ होत आहे. सोमवारी 19 हजार 163 कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. यात 2,549 चालक, तर 2,250 वाहकांचा समावेश आहे.

31 दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत. गेल्या बुधवारी कर्मचार्‍यांच्या पगारवाढीची घोषणा राज्य सरकारने केली. तरीदेखील कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहिले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत फक्त 19 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत,तर आजही 73 हजार 103 कर्मचारी संपात सहभागी आहेत. एसटीच्या राज्यातील 250 आगारांपैकी जेमतेम 50 आगारांतून तुरळक वाहतूक सुरू झाली आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यातील विविध मार्गांवर 1 हजार 86 एसटी धावल्या.त्यामध्ये 197 शिवशाही, 67 शिवनेरी आणि 822 साध्या गाड्यांचा समावेश आहे.

संघर्ष एसटी कामगार युनियनचे उपोषण (ST Employees strike )

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून सकारात्मक मार्ग काढावा यासाठी संघर्ष एसटी कामगार युनियनने सोमवारपासून बेमुदत लक्षवेधी उपोषणाला सुरुवात केली आहे.तसे पत्रदेखील मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. परिवहन प्रशासन आमच्या कर्मचार्‍यांवर कारवाई करीत आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना सेवेतून मुक्त करावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सोमवारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी एसटीच्या परळ आगारात उपोषण सुरू केले; परंतु दादर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

निलंबनाची कारवाई सुरूच (ST Employees strike )

एसटीतील रोजंदारीवरील 254 कर्मचार्‍यांची सेवा सोमवारी समाप्त करण्यात आली. त्यामुळे या कर्मचार्‍यांची एकूण संख्या 1 हजार 779 वर पोहोचली आहे. रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची संख्या 2,632 आहे,त्यापैकी 2,545 कर्मचार्‍यांना नोटीस बजावली आहे,तर एसटीतील नियमित सेवेत असलेल्या 7 हजार 585 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. सोमवारी 1 हजार 88 कर्मचार्‍यांंवर निलंबनाची कारवाई केली.

Back to top button