लाच घेतल्याचा आरोप असलेल्या चार पालिका अधिकार्‍यांना बढती | पुढारी

लाच घेतल्याचा आरोप असलेल्या चार पालिका अधिकार्‍यांना बढती

मुंबई ; पुढारी डेस्क : लाच घेतल्याचा आरोप असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागातील चार अधिकार्‍यांना बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चौघांचीही चौकशी सुरू आहे. लाच प्रकरणात अडकलेल्या अधिकार्‍याला चौकशी पूर्ण झाल्याशिवाय बढती देऊ नये असे निर्देश महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा समितीने दिले होते. ते निर्देश धाब्यावर बसवण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा समितीने लाचप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधिक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तब्बल 50 अधिकार्‍यांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय 5 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत घेतला होता.

त्यानंतर संबंधित 50 अधिकार्‍यांनी लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेली सुनावणी तसेच त्यांची विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत एकाही अधिकार्‍याला बढती देऊ नये तसेच त्यांना अकार्यकारी पदावर कायम ठेवण्यात यावे असे निर्देश 22 मार्च 2021 रोजी देण्यात आले होते. त्यानुसार 14 मे रोजी परवाना विभागातील 3 अधिकारी आणि दोन कर्मचार्‍यांना दादर येथील परवाना विभागात अकार्यकारी पदावर ठेवण्यात आले होते.

मनुष्यबळाअभावी पाचजणांना बढती

मुंबई महानगरपालिकेतील नोंदींमधील प्राप्त माहितीनुसार 7 जून रोजी परवाना विभागाने तीन अधिकारी आणि 2 कर्मचार्‍यांना बढती देण्याबाबत पत्र लिहिले. संबंधित अधिकारी आणि कर्मचारी अकार्यकारी म्हणून कार्यरत नसल्याचे आणि विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याचा युक्तिवाद पत्राद्वारे करत परवाना विभागाने चौकशी विभागाला त्यांना बढती देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली.

यावर उत्तरादाखल चौकशी विभागाने परवाना विभागाला आढावा समितीच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले. दरम्यान, आढावा समितीच्या निर्देशांचे उल्लंघन करत परवाना विभागाचे अधीक्षक शरद बांडे यांनी विशेष उपायुक्त संजय कबरे यांच्या मंजुरीने चार कर्मचार्‍यांना बढती देण्याबाबतचे आदेश जारी केले.

वरिष्ठ परवाना निरीक्षक संतोष सावंत, निरीक्षक सचिन संख्ये, अनिल राठोड आणि कर्मचारी शिवाजी भोसले आणि देवराज शेट्टी या पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधिक विभागाने लाच घेताना पकडले होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. हॉकर्स युनियनने माहिती अधिकाराखाली याबाबतची माहिती मागवली आहे. दरम्यान, संबंधित कर्मचार्‍यांना बढती देणार्‍या परवाना विभागाचे अधीक्षक शरद बांडे यांचे निलंबन करण्याची मागणी भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे.

कुणाला कुठे बढती

संतोष सावंत यांची मालाडच्या पी उत्तर वॉर्डमध्ये वरिष्ठ निरीक्षक म्हणून, सचिन संख्ये यांची एच पूर्व (वांद्रे पूर्व) येथे निरीक्षक म्हणून, अनिल राठोड यांची एस वॉर्ड (भांडुप) येथे निरीक्षक म्हणून, कर्मचारी देवराज शेट्टी याला आर उत्तर (दहिसर) येथे बढती देण्यात आली, तर आणखी एक जण शिवाजी भोसले हे 31 मे रोजी निवृत्त झाले.

संबंधित चार जणांना देण्यात आलेली बढती ही प्रशासनातील चूक किंवा गोंधळ आहे. ही चूक जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा संबंधित चार जणांना पुन्हा पालिका मुख्यालयात रुजू होण्यास सांगितले. त्यानुसार तिघे पुन्हा पालिका मुख्यालयात रुजू झाले असून लवकरच आणखी एक जणही रुजू होईल, अशी माहिती पालिका विशेष उपायुक्त संजय कबरे यांनी दिली.

Back to top button