भिवंडी मध्ये खुल्या मैदानातील लग्नाच्या हॉलला भीषण आग | पुढारी

भिवंडी मध्ये खुल्या मैदानातील लग्नाच्या हॉलला भीषण आग

भिवंडी ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळाली असून अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दिड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे.

या मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करतांना मंडपाला आग लागली. त्यानंतर हळू हळू हि आग पसरून वाहन पार्किंग असलेल्या ठिकाणी ही आग लागल्याने सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दिड दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.

भिवंडी मध्ये मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे मॅरेज हॉल थाटले आहेत. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

Back to top button