हापूस आंब्याचा हंगाम यंदा तीनच महिने | पुढारी

हापूस आंब्याचा हंगाम यंदा तीनच महिने

नवी मुंबई l राजेंद्र पाटील : हापूस आंबा हा फळांचा राजा. त्यातही कोकणच्या हापूसची चव काही न्यारीच. हिवाळा सुरू झाला की, खवय्यांना हापूस आंब्याचे वेध लागतात. मात्र, गेली दोन वर्षे हापूसला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे लादलेले निर्बंध आणि नंतर वादळ व पावसाचा फटका, तर अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे कोकण हापूसची मुंबईवारी लांबणार असून, यंदा हापूसचा हंगाम केवळ 90 दिवसांचा असेल. कोरोनामुळे गेल्यावर्षी उलाढाल 150 कोटींनी घसरली. यंदा उलाढाल किती होईल, हे तूर्त सांगणे अशक्य आहे. एप्रिलपर्यंत हापूसची आवक चांगली राहिल्यास 350 कोटींहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.

15 ते 20 फेब्रुवारीपासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल, अशी स्थिती होती. मोहोराला चांगली सुरुवात झाली होती. मात्र, अवकाळी तडाखा बसल्याने मोहोर गळून पडण्याचे प्रमाण वाढले. सुरुवातीला येणार्‍या हापूसचा हंगाम शेतकरी आणि व्यापार्‍यांच्या हातून जाण्याची भीती आहे. हापूसच्या सुरुवातीच्या हंगामाला पहिला फटका सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचा बसण्याची शक्यता घाऊक व्यापारी आणि बागा खरेदीदार संजय पानसरे यांनी व्यक्‍त केली.

कोकणातील मोठ्या शेतकर्‍याला सुमारे 10 लाख, तर लहान शेतकर्‍याला 50 हजारांपासून 10 लाखांपर्यंत नुकसानीचा फटका केवळ अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे बसेल. हापूस हंगामाला यावर्षी ‘एपीएमसी’ घाऊक बाजाराचा फायदा होणार नाही. मात्र, निर्यातीला कुठलाही फटका बसणार नाही.

25 एकरचा फवारणीचा खर्च 70 हजार

एका फवारणीचा 20 ते 25 एकर बागेचा खर्च हा 70 हजार रुपये येतो. फवारणी औषधाचा दर सुमारे सहा हजार रुपये लिटर असल्याने महागाईचा चटका सोसत संकटाला सामोरे जाण्याची वेळ आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापार्‍यांवर आली आहे. सुमारे 225 हून अधिक घाऊक व्यापार्‍यांनी हापूसच्या बागा आधीच विकत घेतल्या आहेत. महागाची फवारणी केल्यानंतरही किती उत्पादन होईल, हे आता सांगणे अशक्य असल्याचे बागा खरेदीदार संजय पानसरे यांनी सांगितले.

मुंबईतील 250 व्यापार्‍यांकडून बागा खरेदी

हापूस उत्पादक शेतकरी कम व्यापारी हे मुंबईसह इतर ठिकाणच्या घाऊक व्यापार्‍यांना बागा खरेदी करून देतात. त्यासाठी शेतकर्‍यांना ठराविक रक्‍कम आगाऊ दिली जाते. आंबा बाग खरेदी केलेल्या व्यापार्‍यांकडेच विक्रीसाठी कोडनुसार पाठवला जातो. मुंबईतील सुमारे 250 घाऊक व्यापार्‍यांनी बागा खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई ‘एपीएमसी’ 800 घाऊक व्यापारी हापूसचा व्यापार करतात. तसेच स्थानिक सुमारे 5 हजार व्यापारी आहेत. त्यामध्ये काही किरकोळ विक्रेत्यांना माल देणार्‍या व्यापार्‍यांचा ही समावेश आहे.

Back to top button