परमबीर सिंग यांना सीआयडीचे समन्स | पुढारी

परमबीर सिंग यांना सीआयडीचे समन्स

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाने फरार घोषित केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यानुसार येत्या सोमवारी आणि मंगळवारी सिंग यांना चौकशीला बोलावण्यात आल्याची माहिती आहे.

हॉटेल्स, बार, ऑर्केस्ट्राचालकांकडून पोलिसांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. सिंग यांच्या आरोपांवरून गुन्हे दाखल करून केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय आणि ईडीने कारवाई सुरू ठेवली आहे. राज्य शासनही चांदीवाल आयोगामार्फत याची चौकशी करत आहे.

पुढील काळात परमबीर यांच्यावरही भ्रष्टाचारांच्या आरोपांचे सत्र सुरूच झाले. यात मुंबई आणि ठाणे पोलिसांत एकूण पाच गुन्हे दाखल झाले. यातील तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे.

यापैकी ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या व भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सीआयडीने जून महिन्यात चंदीगडला जाऊन परमबीर यांचा जबाब नोंदविल्याची महिती मिळते. तर, अन्य दोन गुन्ह्यांच्या चौकशीसाठी सीआयडीने परमबीर सिंग यांना समन्स बजावली आहेत.

भाईदरमधील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणी वसुलीचा गुन्ह्यात परमबीर यांना सोमवारी तर, ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र, चांदीवाल आयोगाने बजावलेल्या समन्सनुसार परमबीर यांना सोमवारी आयोगासमोर चौकशीला हजर राहायचे आहे. त्यातच आता सीआयडीने समन्स बजावल्यामुळे परमबीर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Back to top button