Lok Sabha Election 2024 : भाजप ३६ जागा लढण्यावर ठाम

Lok Sabha Election 2024 : भाजप ३६ जागा लढण्यावर ठाम
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या शिंदे गटाला 8, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 4 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवत केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी या आपल्या मित्रपक्षांना जबर धक्का दिला. शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही गट या धक्क्याने अस्वस्थ झाले असून, पुन्हा दिल्ली दरबारी जाऊन चर्चा करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. त्यातही एक दिलासा देणारा मार्ग शहा यांनी दाखवून ठेवला आहे. शिंदे गटाच्या काही उमेदवारांना भाजपच्या तिकिटावर लढावे लागेल, असेही शहा यांनी शिंदे गटाला सांगितल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)

मंगळवार आणि बुधवार असा दोन दिवसांचा दौरा करून अमित शहा दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी उशिरापर्यंत खलबते केली. शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी स्वतंत्र चर्चादेखील केली. बुधवारी चौघा नेत्यांमध्ये ही चर्चा पुन्हा पुढे सुरू राहिली.

जिंकण्याची खात्री या एकमेव निकषावर भाजपने आपली यादी तयार केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा लढल्या होत्या. यावेळेस या 25 जागांशिवाय आणखी 11 जागा भाजपला हव्या आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, 36 जागा स्वतःकडे ठेवण्याची भाजपची सुरुवातीपासून रणनीती होती. मित्रपक्षांच्या आग्रहानंतर भाजपने 32 पर्यंत खाली येण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शिंदे गटाच्या खासदारांबाबत वाढती नकारात्मकता आणि त्यांच्या आमदारांच्या वर्तनामुळे ही नकारात्मकता वाढत असल्याचे लक्षात आल्याने भाजपने आपली भूमिका बदलली आणि 36 किंवा 37 जागांचा भाजपचा आग्रह आता कायम ठेवला आहे. उर्वरित सात-आठ जागा शिंदे गटाला आणि तीन ते चार जागा अजित पवार गटाला सोडण्यास भाजप तयार असल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)

शहा यांचा शिंदे, पवारांना सल्ला

नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, अशा सूचना अमित शहा यांनी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिल्या. यंदाच्या निवडणुकीत 'एनडीए'साठी 400 पारचे उद्दिष्ट भाजपने नक्की केले आहे. त्यामुळे जागावाटपात कोणतीच जोखीम न पत्करण्याची भाजपची भूमिका आहे. भाजपने केलेल्या विविध सर्वेक्षणांनंतर शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार जिथे हमखास विजयी होतील, त्याच जागा मित्रपक्षांना सोडण्याचे भाजपचे धोरण असल्याचे शहा यांनी ऐकवले. जागांच्या मागणीवर अडून न बसता हमखास जिंकू अशाच जागा घ्या, जागांची मागणी महत्त्वाची नाही; तर सर्वेक्षणाचा अहवाल महत्त्वाचा आहे, असे शहा यांनी स्पष्ट शब्दांत सुनावल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. आमच्या सर्वेक्षण अहवालात अनेक जागा अडचणीच्या दिसताहेत. तिथे एक तर उमेदवार बदलावा लागेल किंवा पक्ष. या अदलाबदलीची तयारी ठेवा, असेही अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले.

शिंदे गटाने विद्यमान 13 खासदारांसह आणखी तीन जागांची मागणी केली आहे. एकीकडे, शिंदे गटाकडून 16 जागांसाठी आग्रह चालू असताना भाजप नेतृत्वाने मात्र सर्वेक्षणाचा हवाला देत शिंदे गटाला पाच विद्यमान खासदारांच्या जागांवरचा दावा सोडण्याचा सल्ला दिला आहे. शिंदे गटाला जितक्या जागा तितक्याच आम्हाला, अशी भूमिका राष्ट्रवादीने जाहीर केली होती. जवळपास आठ ते बारा जागांसाठी अजित पवार गट प्रयत्नशील होता. मात्र, राष्ट्रवादीच्या वाट्याला चार जागा येण्याची शक्यता आहे.

दिल्लीत कोअर कमिटीची बैठक

मुंबईत अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या बैठका झाल्यानंतर प्रदेश भाजपचे कोअर कमिटीचे नेते दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील जागावाटपावर त्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news