सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शिष्टाई, विधान परिषदेच्या ४ जागा बिनविरोध | पुढारी

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शिष्टाई, विधान परिषदेच्या ४ जागा बिनविरोध

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ;  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये झालेल्या शिष्टाईत चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र, दोन जागा बिनविरोध करण्याबाबत एकमत न झाल्याने या दोन जागांवर चुरशीची लढत होणार आहे. नागपूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, तर अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. मुंबईच्या दोन आणि कोल्हापूर व धुळे अशा चार जागा बिनविरोध झाल्या आहेत.

या निवडणुकीपूर्वी राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे पेवच फुटले होते. त्याचवेळी ‘ईडी’च्या कारवाया, मंत्र्यांवरील आरोप, महाविकास आघाडीवर चौफेर टीका आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून दिले जाणारे प्रत्युत्तर, यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर होणार्‍या निवडणुका ईर्ष्येने लढल्या जाणार, अशी चर्चा होती.

मात्र, मर्यादित मतदारसंघ, विद्यमान आमदारांचा मतदारांशी थेट संपर्क आणि त्यांचा प्रभाव, यामुळे सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक प्रस्थापित उमेदवारांविरुद्ध अवघड होत असल्याचे चित्र दिसले आणि ‘ज्याच्या जागा त्याच्याकडे ठेवायच्या,’ अशा एका समान धाग्यातून बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू झाली.

वाटाघाटी होऊन अखेर भाजप आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांना तीन मतदारसंघांत माघार घ्यायला लावली आणि चार उमेदवार बिनविरोध निवडून आले. मुंबईत विधान परिषदेच्या दोन जागा असून, शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह हे निवडून आलेत. तेथे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुरेश कोपरकर यांनी माघार घेतली. येथे माघारीसाठी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला विजय मिळाला.

कोल्हापूर मतदारसंघात चुरस होती. मात्र, भाजपने धुळ्याची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे काँग्रेसचे गौरव वाणी यांनी माघार घेतली. त्यामुळे कोल्हापुरातून भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतली. भाजपच्या माघारीमुळे कोल्हापुरात गृह राज्यमंत्री सतेज पाटील, तर धुळ्यातून माजी मंत्री भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध निवडून आले.

नागपूर आणि अकोला मतदारसंघांत मात्र ही निवडणूक ईर्ष्येने लढली जाणार आहे. नागपूरमध्ये भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे छोटू भोयर यांच्यात लढत होणार आहे. भोयर हे भाजपमधून अलीकडेच काँग्रेसमध्ये आले आहेत. ते माजी उपमहापौर आहेत. बावनकुळे यांना विधानसभेत उमेदवारी नाकारण्यात आली होती. तेव्हापासून ते नाराज होते. आता उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे.

भाजपकडे आज 60 मते जादा आहेत, असे विचारले असता काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार डॉ. सुनील ऊर्फ छोटू भोयर म्हणाले की, ही निवडणूक वैयक्तिक संबंधातून लढविली जाते. चंद्रशेखर बावनकुळे हे निवडून यावेत, असे भाजपच्या नेत्यांना तरी वाटते का, या प्रश्नातच आपला विजय आहे.
अकोला – बुलडाणा – वाशिम मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या विरोधात भाजपचे वसंत खंडेलवाल रिंगणात आहेत. शिवसेना, भाजपच्या ताणलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

 भाजपकडून दोनच जागांचा प्रस्ताव ः नाना पटोले

भाजपकडून विधान परिषदेसाठी दोन जागांबाबतच प्रस्ताव आला होता. धुळ्यात काँग्रेसचे गौरव वाणी यांनी माघार घ्यावी. त्यासाठी आपण कोल्हापुरात माघार घ्यायला तयार आहोत. हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला. नागपूरच्या जागेबाबत भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. भोयर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून, सर्व मित्र पक्षांची मते मिळवून ते विजय होतील, असा विश्वास पटोले यांनी बोलून दाखविला.

भाजपसाठी नागपूरची लढत प्रतिष्ठेची

भाजपसाठी नागपूरची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. अलीकडेच झालेल्या नागपूर बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे, तर नागपूर पदवीधर मतदारसंघावर नेहमीच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. तत्कालीन आमदार अनिल सोले यांना डावलून भाजपने माजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. येथे काँग्रेसचे अभिजित वंजारी निवडून आले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे.

Back to top button