कल्याण मध्ये पाच दिवसांच्या बाळाची 2 लाखांत विक्री | पुढारी

कल्याण मध्ये पाच दिवसांच्या बाळाची 2 लाखांत विक्री

ठाणे ; अनुपमा गुंडे : कल्याण मध्ये अवघ्या पाच दिवसांच्या बाळाची दोन लाख रुपयांना विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला व बालविकास समितीच्या अधिकार्‍यांनी बुधवारी रात्री कारवाई करून नंदादीप फाऊंडेशनच्या गरजू व अनाथ मुलांच्या बालगृहातून 2 ते 18 वर्षे वयोगटातील 71 चिमुकल्यांची सुटका केली. या बालकांंना शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे.

डोंबिवली येथील प्रिया संतोष अहिरे व संतोष अहिरे या जोडप्याने आपले 5 दिवसांचे बाळ कल्याण येथील डॉ. केतन सोनी यांना विकल्याची तक्रार महिला व बालविकास विभाग तसेच चाईल्डलाईन संस्थेने केल्यानंतर रामनगर पोलिस ठाण्यात बाल न्याय अधिनियम 2015 कलम 80 व 81 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणातील मातेने दिलेल्या माहितीच्या आधारे महिला व बालविकास समिती व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी कल्याणमधील पार नाका येथील नंदादीप फाऊंडेशनच्या अनाथ व गरजू मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली.

या संस्थेतील बालकांच्या कोणत्याही नोंदी नसल्याचे आढळले.संस्थाचालकांनी बालगृहासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले. कमालीची अस्वच्छता, मुलांना दिला जाणारा निकृष्ट आहार आणि आरोग्यसेवेचा अभाव अशी भयावह परिस्थिती बालकल्याण समितीपुढे आली. संस्थेतील अवघ्या तीन कर्मचार्‍यांनी लपवाछपवीचा आटोकाट प्रयत्न केला. बालक विक्रीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थेतील काही मुलांना रातोरात अन्यत्र हलवण्यात आल्याचेही समजले.

त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी बाजारपेठ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी कसून चौकशी सुरू करताच या कर्मचार्‍यांनी तोंड उघडले आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संस्थेच्या परिसरातीलच एका जुन्या इमारतीत मुलांना डांबून ठेवण्यात आले होते.

पोलिसांच्या मदतीने अशा 71 मुलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत विधी अधिकारी सिद्धी तेलंगे, चाईल्ड संस्थेच्या श्रद्धा नारकर, सखी उपक्रमाचे चारूदत्त पाटील, बाल कल्याण समितीचे डॉ. सुधीर सावंत, पोखरकर, शुभदा सावंत, सुनीता बाभूळकर यांनी भाग घेतला.

* या संस्थेत आढळलेल्या 71 मुलांपैकी 33 बालके 2 ते 11 वयोगटातील, तर 24 मुले 11 ते 18 वयोगटातील आहेत. त्याशिवाय 14 मुली 11 ते 18 वयोगटातील आहेत. या बालकांना जननी आशिष संस्थेसह शासकीय बालगृहांत ठेवण्यात आले आहे.

Back to top button