नितीन राऊत : वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा | पुढारी

नितीन राऊत : वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा केंद्र सरकारचा डाव हाणून पाडा, असे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. गुरुवारी सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनने पनवेल येथे उभारलेल्या अभियंता भवनच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील वीजक्षेत्र अनेक आव्हाने व अडचणीतून वाटचाल करत असतानाही सर्व अभियंते ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सर्वोत्तम कार्य करत आहेत. मात्र केंद्र सरकार वेगवेगळ्या युक्त्या, दुरुस्ती सुचवून खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. देश स्वतंत्र झाला त्या वेळेस देशाची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता केवळ 1360 मेगा वॅट इतकी होती व दरडोई वर्षाला वीजवापर फक्त 6 युनिट होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाने, पंडित जवाहरलाल यांच्या दूरदृष्टीने व अभियंत्यांच्या अथक प्रयत्नाने आज देशाची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता ऑक्टोबर 2021 अखेर 3 लाख 90 हजार 700 मेगा वॅट इतकी झालेली आहे. तसेच दरडोई वार्षिक वापर आता 1280 युनिटच्या वर आहे. यामुळे राज्याच्या व देशाच्या विकासात विजेचा व अभियंत्यांचा फार मोठा वाटा आहे.

महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढवण्यासाठी सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन पुढाकार घेईल, असा विश्वास डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रनिर्माण कार्यात अभियंते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनने 1981 मध्ये अभियंत्यांच्या अस्मितेसाठी जो अभूतपूर्व संप घडवून आणला व यशस्वी करून दाखवला, याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी अभियंत्यांचे कौतुक केले.

* महाराष्ट्रामध्ये देशातील पहिली 400 के.व्ही. लाईन अभियंत्यांनीच कार्यान्वित केली. आज महाराष्ट्राची निर्मितीची स्थापित क्षमता 13 हजार 182 मेगावॅट एवढी असून महापारेषणचे जवळजवळ 700 ईएचव्हीचे उपकेंद्रे आहेत. महावितरणचे 4000 च्यावर उपकेंद्र कार्यान्वित असून 7 लाख रोहित्रांद्वारा 3 कोटींच्या वर वीजग्राहकांना अखंडपणे व दर्जेदार वीजपुरवठा केला जातो. ते केवळ अभियंत्यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले असल्याचे. डॉ. राऊत म्हणाले.

Back to top button