ST Workers strike : राज्यात एसटीच्या चाकांनी घेतला वेग | पुढारी

ST Workers strike : राज्यात एसटीच्या चाकांनी घेतला वेग

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील एसटी कामगारांना संप (ST Workers strike) मागे घेऊन कामावर परत येण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर परतणार्‍या कामगारांची संख्या काहीशी वाढू लागली आहे. राज्यातील 250 डेपोंमध्ये बुधवारपर्यंत 8 हजार 343 असलेल्या कार्यरत कामगारांच्या संख्येत गुरुवारी 9 हजार 705 इतकी वाढ झाली.

याउलट गुरुवारी राज्यातील 24 डेपोंमधून सुमारे 350 गाड्या धावल्याचा दावा एसटी महामंडळाने केला. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी सुमारे 310 गाड्या धावल्या होत्या. त्यात गुरुवारी 10 टक्क्यांनी वाढ झाली.

परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर सुमारे 350 फेर्‍यांमधून 9 हजार प्रवाशांनी प्रवास केला. राज्यात बुधवारी 310 एसटी बसेसमधून केवळ 6 हजार 600 प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामुळे कामावर परतणार्‍या कामगारांच्या संख्येसह धावणार्‍या बसेस आणि प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचा दावा महामंडळाने केला आहे. (ST Workers strike)

महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, परिवहन मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कामावर येऊ इच्छिणार्‍या कामगारांना शुक्रवारी आणखी एका दिवसाची संधी दिली जाईल. त्यानंतर शनिवारपासून कामावर न येणार्‍या कामगारांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. विशेषतः सेवा समाप्तीसारखी कठोर कारवाई करण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली.

महत्त्वाची बाब म्हणजे निवृत्तीकडे पोहोचलेल्या कर्मचार्‍यांकडून कामावर परत येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एसटीची विभागनिहाय सुरू असलेली आगारे…

विभाग आगाराचे नाव
सांगली सांगली, मिरज, इस्लामपूर,
विटा, कवठेमहांकाळ, जत,
शिराळा, पलूस, आटपाडी, तासगाव
रायगड पेण, महाड
पालघर वसई, ठाणे
कोल्हापूर चंदगड
मुंबई परळ
ठाणे कल्याण
पुणे स्वारगेट, शिवाजीनगर

विभाग आगाराचे नाव

सातारा सातारा
नाशिक नाशिक
रत्नागिरी देवरूख, राजापूर
भंडारा साखोली

Back to top button