नगरपंचायत निवडणूक रणधुमाळी : २१ डिसेंबरला मतदान; आचारसंहिता लागू | पुढारी

नगरपंचायत निवडणूक रणधुमाळी : २१ डिसेंबरला मतदान; आचारसंहिता लागू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ( नगरपंचायत निवडणूक ) 21 डिसेंबर रोजी मतदान, तर 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरची गेल्या दोन वर्षांमधील ही सर्वात मोठी राजकीय लढाई असणार आहे.

आघाडीतील तीन मित्रपक्ष एकत्र लढणार की, स्वबळावर दंड थोपटणार, हे स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी या निवडणुकांची घोषणा केली. ( नगरपंचायत निवडणूक )

एप्रिल 2020 ते मे 2021 या काळातील मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणार्‍या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या निवडीसाठी मतदान होईल. 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर रोजी सुट्टी आहे. अर्जांची छाननी 8 डिसेंबरला होईल. 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होईल. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी सुरू होईल.

प्रमुख जिल्हावार लढती ( नगरपंचायत निवडणूक )

रत्नागिरी – मंडणगड, दापोली.
सिंधुदुर्ग – कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ.
पुणे – देहू (नवनिर्मित).
सातारा – लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी.
सांगली – कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ.
सोलापूर – माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित).

चार महापालिकांच्या रिक्त जागांची पोटनिवडणूक जाहीर ( नगरपंचायत निवडणूक )

धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी दिली.

या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागांत आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टीमुळे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 डिसेंबर रोजी छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबरपर्यंत असेल. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना 10 डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हे देण्यात येतील. 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होईल.

महानगरपालिकानिहाय रिक्त पदे ( नगरपंचायत निवडणूक )

धुळे – 5 ब, अहमदनगर – 9 क, नांदेड-वाघाळा – 13 अ आणि सांगली-मिरज-कुपवाड – 16 अ.

Back to top button