ST workers strike : पहिल्‍या फेरीतील चर्चा सकारात्‍मक | पुढारी

ST workers strike : पहिल्‍या फेरीतील चर्चा सकारात्‍मक

मुंबई : पुढारी ऑनलाईन

परिवहन मंत्री अनिल परब यांच्‍या उपस्‍थितीत सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचार्‍यांच्‍या शिष्‍टमंडळात यांच्‍यात चर्चा झाली. ( ST workers strike )  यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्‍यासह एसटीचे कर्मचारी उपस्‍थित होते. दुपारी बारा ते दोन या कालावधीमध्‍ये पहिली फेरीतील चर्चा झाली. ही चर्चा सकारात्‍मक झाल्‍याचे समजते. यावेळी मंत्री उदय सामंत हे समन्‍वयाच्‍या भूमिकेत होते.

ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन साडेबारा हजार आहे त्यांना साडेअठरा हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मांडण्‍यात आला. यावेळी शिष्‍टमंडळाने नुसती वेतनवाढ नको तर विलिनीकरणच करावे, अशी मागणी केली. चर्चेच्‍या पहिल्‍या फेरीत सकारात्‍मक चर्चा झाल्‍याने याप्रश्‍नी तोडगा निघेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

ST workers strike : अंतरिम वेतनवाढीचा प्रस्‍तावावर झाली होती चर्चा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यासोबत सोमवारी (दि. 22) बैठक घेतली होती. या बैठकीत पवार यांनी तातडीने विलीनीकरण करणे शक्य नसेल, तर कर्मचार्‍यांना 2020-24 या कालावधीसाठी भरघोस पगारवाढ देऊन तोडगा काढावा. तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर विलीनीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असा एक पर्याय सुचवला होता. हा पर्याय समोर ठेवूनच बैठकीत चर्चा झाली होती.

मंगळवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीतील चर्चेचा तपशीलीबाबत माहिती देताना परिवहन मंत्री परब म्‍हणाले होते की, संपावरील कामगार जरी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असले, तरी त्याबाबत हायकोर्टाने एक समिती नेमली आहे. ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. या समितीचे काम सुरू आहे. ही समिती आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करील आणि मुख्यमंत्र्यांकडून तो हायकोर्टाला सादर होणार असल्‍याचेही परब यांनी सांगितले.

हेही वाचलं का?

 

Back to top button