Strike : राज्यातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा उद्या संप | पुढारी

Strike : राज्यातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा उद्या संप

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनदेखील सदर प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उद्या सोमवार (२२ नोव्हेंबर) रोजी  राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद (Strike) पुकारला आहे. यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्याची थकबाकी अदा करावी, पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा, ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १०,२० व ३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी, अकृषी विद्यापीठातील ७९६ पदांना ७ वा वेतन आयोग त्वरित लागू करावा, विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव व समकक्ष पदांना युजीसीच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात यावी आदी विविध प्रलंबित मागण्यासाठी हा लाक्षणिक बंद पुकारला आहे.

या प्रलंबित मागण्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच संचालनायलाकडे वारंवार पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केले आहे. यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या महासंघाच्या कृती समितीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन (Strike) सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या सोमवारी एक दिवस सर्व विद्यापीठ बंद असतील असे समितीने स्पष्ट केले आहे.

Back to top button