मुंबई पालिकेचेही विधानभवनाप्रमाणे सभागृह! | पुढारी

मुंबई पालिकेचेही विधानभवनाप्रमाणे सभागृह!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका मुख्यालयातील सध्याचे सभागृह येणार्‍या काळात बैठकीसाठी अपुरे पडणार असल्यामुळे पालिका विधानभवनप्रमाणे भव्य सभागृह उभारण्याचा विचार करत आहे. हे सभागृह दक्षिण मुंबई अथवा मध्य मुंबईत उभारण्यात येणार असून यासाठी जागेचा शोध सुरू आहे. दरम्यान 2022-23 या आर्थिक वर्षात या सभागृहासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते.

मुंबई महापालिका मुख्यालय असलेले पालिकेचे हेरिटेज सभागृह सर्वसाधारण सभेसाठी कमी पडू लागले आहे. या सभागृहात दाटीवाटीने 245 जण बसू शकतील इतकी जागा आहे. सध्या पालिकेत 232 नगरसेवक असून यात अजून 9 नगरसेवकांची वाढ होणार आहे त्यामुळे नगरसेवकांची संख्या 241 वर पोहचणार आहे. सर्वसाधारण सभेच्या वेळी किमान 15 ते 20 अधिकारी, चिटणीस विभागाचे किमान 10 ते 12 कर्मचारी, 20 ते 25 पत्रकार अशी 300 पेक्षा जास्त आसन व्यवस्था असणे आवश्यक आहे. कोरोना नियमामुळे सध्या या सभागृहात सर्वसाधारण सभा बोलावणे शक्य नाही.

त्यामुळे पालिकेने राणीबाग येथील अण्णाभाऊ साठे सभागृह अथवा विलेपार्ले येथील मा. दीनानाथ नाट्यगृह याचा सभागृह म्हणून उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नाट्यगृहाचा फार काळ उपयोग करणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेला नव्या सभागृहाची उभारणी करावीच लागणार आहे. मात्र तातडीने सभागृह उभारणी शक्य नसल्यामुळे मुंबई महापालिका सर्वसाधारण सभा नाट्यगृहातच घ्याव्या लागणार आहेत.

पालिका सभागृह उभारणे आवश्यक असल्यामुळे पालिकेने जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. विधानभवन व नवी मुंबई महापालिका सभागृहाच्या धर्तीवर मुंबईत भव्य सभागृह उभारण्याचा पालिकेचा मानस आहे.

याबाबतचा आराखडा लवकरच तयार करून 2022 मध्ये या सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

असे असेल पालिकेचे नवे सभागृह

* या सभागृहात सर्वसाधारण सभेसाठी आणि अन्य समितींसाठीही सभागृह असेल
* सभागृह उभारताना पुढील 50 वर्षात नगरसेवकांची वाढती संख्या गृहीत धरली जाईल.
* पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेता व अन्य वैज्ञानिक समित्यांचे अध्यक्ष, पालिका आयुक्त दालन, पत्रकार कक्ष, प्रतीक्षालय, उपाहारगृह, आराम कक्ष असेल.

Back to top button