डोंबिवली : मालमत्तेच्या वादातून झालेल्या हत्येचा उलगडा | पुढारी

डोंबिवली : मालमत्तेच्या वादातून झालेल्या हत्येचा उलगडा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा

झारखंड राज्यातील गावाकडे असलेल्या जमिनीसाठी सुरू असलेल्या वादातून चुलत भावाचा काटा काढून पसार झालेल्या आरोपीच्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. डोंबिवलीजवळच्या गोळवलीत झालेल्या या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला न जुमानता पोलिसांनी या खुन्याला झारखंड राज्यातील एका गावात घुसून ताब्यात घेतले. मात्र या हत्येशी संबंधित असणारा त्याचा भाऊ मात्र अद्याप पोलीसांच्या हाती लागलेला नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (डोंबिवली पाेलीस)

कालूकुमार सिताराम महंतो (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी दिली.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कल्याण-शिळ मार्गावरील गोळवली गावातल्या, दर्शन पाटील चाळीजवळ एक जण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून पोलिस ठाण्यात देण्यात आली. सपोनि ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता, हा इसम बेशुध्दावस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झालेली होती.

पोलिसांनी तात्काळ त्याला केडीएमसीच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने, त्याला मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर इसमावर झालेल्या जखमा गंभीर स्वरुपाच्या असून त्याला कोणत्यातरी जड वस्तूच्या सहाय्याने मारहाण झाल्याचे सांगितले.

Sania Ashiq : महिला आमदाराचा बॉयफ्रेंडसोबतचा अश्लील Video Viral झाल्याने खळबळ

या घटनेचे गांभीर्य ओळखून, सपोनि अविनाश वनवे व सपोनि ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी, जखमीची ओळख पटवली. जखमीचे नाव पुरण सिकंदर महंतो (47, रा. गोळवली गाव, मुळ रा. झारखंड राज्य) असल्याचे समजले.

याबाबत पोलिसांनी महंतोच्या मुळ गावाकडील नातेवाईकांकडे चौकशी केली असता, महंतो व त्याचे चुलत भाऊ हे डोंबिवलीजवळच्या गोळवली गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्या दोघांच्यात गावाकडील संपत्तीवरून वाद सुरू असून, त्यांच्याच मोठा वादही झाला आहे शिवाय मुळगावी एकमेकांविरोधात गुन्हेही दाखल आहेत.

ओली पार्टी झाल्यानंतर केला हल्ला

बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री कालूकुमार आणि लालूकुमार यांनी कट रचला. या दोघांनी पुरणला ओली पार्टी करण्यासाठी घरी बोलावले. तेथे त्याला दारू पाजण्यात आली. त्याला दारूची नशा जास्त झाल्यावर दोघा भावांनी गावाकडील संपत्तीच्या वादातून पुरणशी भांडण उकरून काढले. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघा भावांनी त्याला मारहाण करून पुरणच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा मृत्यू झाल्याची भिती घेवून, दोघांनीही तेथून पळ काढला. जखमी आणि बेशुद्धावस्थेत असलेल्या पुरणचा मुंबईतील सायन हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान सोमवारी 8 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.

हल्लेखोरांची ओळख पटली

डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे सपोनि शेखर बागडे यांनी, सखोल चौकशीआधारे संशयीत कालूकुमार आणि त्याचा भाऊ लालूकुमार सिताराम महंतो यांचा विविध ठिकाणी अखेर दोघेही त्यांच्या झारखंड राज्यातील मुळ गावी पसार झाल्याची माहिती मिळाली.

खुन्यांना सोडविण्यासाठी पोलिसांवर हल्ला

कालूकुमार आणि लालूकुमार यांचा शोध घेण्यासाठी वपोनि अविनाश वणवे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र खिलारे, भानुदास काटकर, विजय कोळी, प्रवीण किनरे, भारत कांदळकर यांनी झारखंडमध्ये जाऊन शोध मोहीम सुरू केली. दोघेही आपल्या मुळगावात लपल्याची माहिती मिळताच, या पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेतली. पोलिसांना पाहताच गावकरी प्रक्षुब्ध झाले. खुन्यांना पाठीशी घालण्यासाठी या गावकऱ्यांनी थेट पोलिस पथकावरचं दगडांनी हल्ला चढवला. मात्र गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांनी कालूकुमार महंतो याला ताब्यात घेतले. मात्र लालूकुमार फरार झाला.

हल्लेखोर गावकऱ्यांवरही गुन्हा

पुरणचे खुनी कालूकुमार आणि लालूकुमार यांना उचलायला गेलेल्या पोलिसांवर हिंसक जमावाने दगडांचा मारा केला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वपोनि शेखर बागडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे समोर हिंसक जमाव आणि दगडांचा मारा, अशा भयानक परिस्थितीतही स्वतःचा जीव धोक्यात घालून खुन्याला जेरबंद करणाऱ्या सपोनि अविनाश वणवे यांच्यासह राजेंद्र खिलारे, भानुदास काटकर, विजय कोळी, प्रवीण किनरे, भारत कांदळकर या बहाद्दर पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतूक करण्यात येत आहे.

हे ही वाचा :

Back to top button