ST employees strike : 2,296 एसटी कर्मचार्‍यांना एसटीचा अल्टिमेटम | पुढारी

ST employees strike : 2,296 एसटी कर्मचार्‍यांना एसटीचा अल्टिमेटम

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : संप (ST employees strike) मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला असून, बुधवारपयर्ंत रोजंदारीवरील तब्बल दोन हजार 296 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिस पाठविल्या. 24 तासात समाधानकारक उत्तर दिले नाही तर या कर्मचार्‍यांची सेवा खंडित होऊ शकते. 24 तासांत कामावर हजर व्हा नाही तर सेवा समाप्त करण्यात येईल, असा अल्टीमेटम या नोटिसांमध्ये देण्यात येत आहे.

एसटीतील 93 हजार कर्मचार्‍यांपैकी 84 हजार 866 कर्मचारी संपात सामील असून 7 हजार 400 कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. संपावरील अडीच हजार कर्मचार्‍यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले असले तरी या कारवाईनंतरही कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अत्यल्प आहे. (ST employees strike)

परिणामी, जेमतेम एसटीच्या 103 बस बुधवारपर्यंत धावल्या आणि दोन हजार 756प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळेच सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटिस बजावणे महामंडळाने सुरू केले आहे. एसटी महामंडळात संपूर्ण राज्यात दोन हजारपेक्षा जास्त रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक व वाहकही आहेत.

* मुंबईत आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणारे एसटी कर्मचारी मात्र संपाच्या भूमिकेवर ठाम असून, विलीनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय मैदान सोडायचे नाही या भूमिकेवर मंगळवारपासून पडणार्‍या पावसातही कायम आहेत.

Back to top button