Parambir Singh : परमबीर सिंग अखेर फरार घोषित | पुढारी

Parambir Singh : परमबीर सिंग अखेर फरार घोषित

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार गुन्हेगार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. यामुळे पोलिस आता परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया करु शकणार आहेत. जर परमबीर सिंग ३० दिवसांच्या आत हजर झाले नाहीत, तर मुंबई पोलीस त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील, अशी माहिती विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी दिली आहे.

परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप करत लेटरबॉम्ब टाकला होता. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तर परमबीर सिंग पसार झाले होते. याच प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटकदेखील झाली.

परमबीर सिंग यांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगासमोर परमबीर सिंग हजर झाले नव्हते. देशमुख यांना या प्रकरणात ईडीने अटक केली. त्यानंतर लगेचच परमबीर सिंग यांनी चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

परमबीर यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांचा एकसदस्यीय चौकशी आयोग सरकारने नेमला आहे. अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग हे कोर्टात हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ठाणे आणि मुंबई कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहेत. तसेच ते देशाबाहेर गेल्याचा आरोपही केला जातोय.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मुंबईत मराठी आवाज बाळासाहेबांनी बुलंद केला | बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विशेष |balasaheb Thackeray

Back to top button