प्लास्टिक कचर्‍यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मात्रा | पुढारी

प्लास्टिक कचर्‍यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मात्रा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जगासमोर ‘आ’ वासून उभ्या असलेल्या प्लास्टिक कचर्‍याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत असलेल्या अक्षता पाटील हिने अभिनव संकल्पना मांडली आहे. तिच्या प्रकल्पावर द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीनेही (आयईटी) शिक्कामोर्तब केले. आयईटीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या स्पर्धेत पश्चिम भारत विभागातून अक्षताने मांडलेल्या प्रकल्पाची अव्वल स्थानी निवड झाली आहे.

अक्षताने सादर केलेल्या ‘प्रिव्हेंटिंग अ मरिन डिझास्टर : टेक्नॉलॉजिकल सोल्युशन टू डील विथ प्लास्टिक वेस्ट जनरेटेड बाय द पँडेमिक’ या विषयावरील सादरीकरणाने सर्वच परीक्षकांची वाहवा मिळवली. या प्रकल्पात अक्षताने समुद्रातील वाढत्या प्लास्टिक कचर्‍यावरील उपाय सुचवले आहेत. या प्रकल्पाबाबत अक्षताने ‘पुढारी’ला सविस्तर माहिती दिली.

लॉकडाऊन काळात एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वापरात मोठी वाढ झाली. परिणामी, मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर प्लास्टिकचा खच दिसतो. त्यामुळे समुद्राचे प्रदूषण होत असून जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे, याकडे अक्षताने लक्ष वेधले. कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्याने समुद्रातील प्लास्टिकचा थर वाढतच आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून दीर्घकालीन कचरा व्यवस्थापनाची प्रणाली आवश्यक आहे, असे अक्षता म्हणाली.

असा असेल प्रकल्प

* पहिल्या टप्प्यात समुद्र किनार्‍यावरील आणि मोठ्या रुग्णालयांतील कचरा उचलला जाईल.

* दुसर्‍या टप्प्यात ओला व सुका असे कचर्‍याचे वर्गीकरण केले जाईल. समुद्रकिनार्‍यावरील कचरा संकलनासाठी हायब्रिड रोबोट्सचा वापर करता येईल.

* आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा वापर करून कचर्‍याचे सूक्ष्म पातळीवर अचूक वर्गीकरण केले जाईल.

* कोरोनाशी संबंधित आणि सर्व रुग्णालयीन कचरा 10 दिवस कंटेन्मेंट झोनमध्ये ठेवून निर्जंतुकीकरण केले जाईल.

* वर्गीकृत आणि निर्जंतुकीकरण झालेला कचरा थ्रेडरमध्ये टाकून त्याचे अगदी छोटे तुकडे केले जातील.

* या तुकड्यांचा पुनर्वापर पीपीई किट, मोटारींचा अंतर्भाग, रस्ता बांधण्यापासून विविध कामांसाठी करता येईल.

* शक्य तिथे माणसांचा वापर करून आणि शक्य नसेल तिथे तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प राबवता येईल.

कचरा व्यवस्थापनातील महत्त्वाचे पाच टप्पे

समुद्रात जमा झालेल्या कचर्‍याचे व्यवस्थापन पाच टप्प्यांत करावे लागेल. आधुनिक पद्धतीने कचरा गोळा करणे, कचर्‍याचे वर्गीकरण करणे, निर्जंतुकीकरण करणे, विघटन करणे आणि सर्वांत शेवटी कचर्‍याचा पुनर्वापर करणे असे हे पाच टप्पे आहेत. कचर्‍याचा पुनर्वापर ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असून त्यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यात मोठी मदत होईल, असा विश्वास अक्षता व्यक्त करते.

Back to top button