देवेंद्र फडणवीस : आघाडी सरकार विरोधात आता रस्त्यावर एल्गार | पुढारी

देवेंद्र फडणवीस : आघाडी सरकार विरोधात आता रस्त्यावर एल्गार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अमरावती, नांदेड आदी ठिकाणी झालेल्या हिंसाचारामागे केंद्र सरकारच्या विरोधात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा डाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला उत्तर देता येत नसल्याने धर्माच्या नावावर अराजक निर्माण करुन मुस्लिमांना भडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. भाजप कार्यकर्त्यांनी आता आघाडी सरकार विरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारण्याचे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानुसार पारीत केलेल्या राजकीय ठरावात डिसेंबरमध्ये मुंबईत भाजपचे मोठे आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.

भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी दादरच्या वसंतस्मृतीमध्ये झाली. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यात उसळलेल्या दंगलींमागे राज्य सरकारचाच हात असल्याचा आरोप केला. अमरावती, मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा प्रयोग आहे. देशात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठीचा हा पॅटर्न आहे. हिंदूंची दुकाने शोधून जाळली जातात, पण महाविकास आघाडीचा एकही नेता एक शब्दही बोलत नाही, हिंदू असो वा मुस्लिम कोणाचीच दुकाने जाळली जाता कामा नयेत, असे फडणवीस म्हणाले.

आम्ही दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहात नाही. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्याची खोटी छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरविण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्रिपुरातील अत्याचाराची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकली. त्यानंतर लगेच 11 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मोर्चे निघाल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना कोणी मानत नाहीत

राज्यात सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. एक मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. प्रत्येक मंत्री हा स्वतः ला मुख्यमंत्रीच समजतो. आपल्या पलिकडे पाहायची कोणाचीही तयारी नाही, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राऊत यांना चिमटा

अमरावतीत हिंदूंची दुकाने जाळली, लूटमार केली. मात्र शिवसेना नेते संजय राऊत हे भाजपने हिंसाचार केला म्हणतात. या पूर्वी हिंदुत्वाची भाषा बोलणारे संजय राऊत हे आज काँग्रेस-राष्ट्रवादीची भाषा बोलत आहेत, असे सांगत काय होतास तू, काय झालाच तू, या ओळी त्यांनी राऊत यांच्याबद्दल ऐकवल्या. हिंसाचाराचे षड्यंत्र उघड होऊ नये म्हणून नवाब मलिक यांनी भाजपवर केलेले आरोप हे कव्हर फायरिंग होते, असा आरोपही त्यांनी केला.

नक्षलवाद्यांना पाकची मदत

नक्षलवाद्यांकडे जे साहित्य सापडले आहे त्यातून त्यांना पाकिस्तान आणि आयसीस या दहशतवादी संघटनेची मदत मिळते हे दिसून आल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

बैठकीतील निर्णय आणि ठराव

* कोरोना विरोधातील लढाईत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या स्पृहणीय कार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव
* राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत ठराव मांडला. बलात्कार, अमली पदार्थ, भ्रष्टाचार, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न म्हणून पक्षातर्फे राज्यभर सभा घेणार.
* आघाडी सरकार विरोधात एल्गार पुकारण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 20 हजार छोट्या सभांचे आयोजन.
* डिसेंबर महिन्यात मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात रोष व्यक्त करणार.
* एसटी कामगारांच्या संपाला कार्यकारिणी बैठकीत पाठिंबा देण्यात आला. या संपात एसटी कामगारांसोबत राहिलेले सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचे कौतुक.
* अमरावती, नांदेड आणि मालेगावच्या दंगलीत मास्टरमाईंड असलेल्या रझा अकादमीवर बंदीची मागणी बैठकीत करण्यात आली.

ठाकरे सरकार इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार

मी महाराष्ट्राचा पाच वर्षे मुख्यमंत्री होतो. पण ज्यावेळी मुख्यमंत्रिपद सोडले त्यानंतर चार महिने भाड्याच्या घरात राहिलो. सरकारी बंगला मिळाल्यानंतर त्यात राहायला गेलो. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही. त्यामुळे कोणालाही घाबरत नाही,असा दावा फडणवीस यांनी केला. सध्याचे ठाकरे सरकार हे इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. प्रत्येक मंत्र्याकडे एक वाझे असून वसुली जोरात सुरू आहे, असा हल्ला फडणवीस यांनी चढविला.

Back to top button