मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना १५ डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे सक्त आदेश माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी दिले. न्यायालयाने राणे यांच्याविरोधात १५ हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
वारंवार बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी आ.राणें यांच्याविरूद्ध खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. या खटल्याची दखल घेत दंडाधिकारी संग्राम काळे यांनी १६ ऑक्टोबरला राणेंविरूद्ध समन्स बजावले होते. आज मंगळवारी या दाव्यावर दंडाधिकारी संग्राम काळे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी नितेश राणेंनी न्यायालयासमोर गैरहजर राहिल्याने खासदार राऊत यांच्यातर्फे अॅड. मनोज पिंगळे यांनी जोरदार आक्षेप घेतला. राणेंना समन्स पोहोच झाले आहे. मात्र ते जाणूनबुजून गैरहजर राहिल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि नितेश राणे यांच्याविरूद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले. स्पीड पोस्टने नितेश राणेंच्या कणकवलीच्या पत्त्यावर वॉरंट बजावण्याचे निर्देशही दिले.
हेही वाचा :